महसूल खात्याच्या मुख्य सचिवांची तहसीलदार कार्यालयाला अचानक भेट
कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी : इमारतीची केली पाहणी
बेळगाव : महसूल खात्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार कतारिया यांनी मंगळवार दि. 17 रोजी अचानक रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयाला भेट दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करण्यासह उपस्थितांकडून माहिती जाणून घेतली. बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ अधिकारी बेळगावात तळ ठोकून आहेत. मंत्रीमहोदय आणि अधिकारी आपल्याशी संबंधित खात्याच्या कार्यालयांना सातत्याने भेटी देऊन पाहणी करण्यासह माहिती जाणून घेत आहेत. विविध कार्यालयातील अधिकारी अधिवेशनासाठी सुवर्णसौधकडे असतानाच वरिष्ठ अधिकारी अचानक कार्यालयांना भेटी देत असल्याने कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडताना पहावयास मिळत आहे.
मंगळवारी महसूल खात्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार कतारिया यांनी अचानक तहसीलदार कार्यालयाला भेट दिली. ते सरळ तहसीलदारांच्या कक्षाकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या ताफ्यामुळे नेमके कार्यालयात काय घडत आहे, याची कल्पना कोणालाच आली नाही. सुऊवातीला तहसीलदार कार्यालयावर छापा पडल्याची अफवा शहरात पसरली. मात्र, काही वेळानंतर महसूल खात्याचे राज्याचे मुख्य सचिव कार्यालयाच्या पाहणीसाठी आले असल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीतील अस्वच्छता पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर असलेल्या बेळगाव वन केंद्रालाही भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान प्रथम आणि द्वितीय दर्जा दोन्ही तहसीलदार अनुपस्थित होते.