माझ्या विरोधातील कागदपत्रे उघड करा
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे आमदार यत्नाळ यांना आव्हान
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोणत्याही क्षणाचाही विचार न करता माझ्याविरोधातील कोणतीही कागदपत्रे किंवा विधान जाहीर करावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना दिले. बेंगळूर येथील येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी रविवारी झालेल्या पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
विजयेंद्र पुढे म्हणाले, माझ्या विरोधात कागदपत्रे असतील तर यत्नाळ यांनी क्षणभरही विचार न करता ती उघड करावीत. काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करण्याची गरज नाही. यत्नाळ यांच्या तडजोडीच्या राजकारणामुळे पक्ष संघटना कुमकुवत चालली आहे. त्यांचे कोणत्याही प्रकारे भले होऊ शकत नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी, ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. मला भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून बदलण्यासाठी त्यांनी आणखी दहा जण जोडल्यास मला काहीच हरकत नाही. तरीही मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा अवमान होईल असे वर्तन करू नये, असे त्यांनी सांगितले.
मी शनिवारी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन केवळ प्रदेश संघटनेबाबत चर्चा केली. याव्यतिरिक्त कोणाविरुद्धही तक्रार किंवा टीका करण्याची मला गरज नाही. यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची विनंती वरिष्ठांकडे केलेली नाही. काही लोक यत्नाळ यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या झाडण्याचे काम करत आहेत. त्यांचा हेतू काहीही असला तरी तो यशस्वी होणार नाही. येडियुराप्पा कुटुंबाचा अपमान करणे ही यत्नाळ एक पदवी मानतात. याबाबत आज सर्वच माजी आमदारांनी वक्तव्य केले आहे. यापुढेही मी यत्नाळ यांनी हे सर्व सोडून पक्ष संघटित करावा, असे आवाहन करतो, असेही विजयेंद्र म्हणाले.