For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेवण्णा 10 मे पूर्वी एसआयटीसमोर हजर होणार?

06:45 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेवण्णा 10 मे पूर्वी एसआयटीसमोर हजर होणार
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा 10 मे पूर्वी एसआयटीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. लैंगिक शोषण आणि चित्रफीत प्रकरण उघडकीस येताच प्रज्ज्वल यांनी विदेश प्रवास हाती घेतला. त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने दोनवेळा नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रज्ज्वल रेवण्णा यांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी वकिलांच्या सल्ल्यानुसार 10 मे पूर्वी विदेशातून परत येऊन एसआयटीसमोर हजर होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने एसआयटीचे पथक प्रज्ज्वल यांना चौकशीपूर्वीच अटक करू शकतील. ते विदेशातून येताच त्यांना विमानतळावर अटक केली जाऊ शकते.

Advertisement

प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध तीन एफआयआर दाखल झाले आहेत. दरम्यान, एका पीडित महिलेने न्यायाधीशांसमोर सेक्शन 164 अंतर्गत जबानी नोंदविली आहे. शुक्रवारी आणखी एका महिलेने प्रज्ज्वल यांच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये सीआयडी पोलिसांत आपल्याला पिस्तूल दाखवून, ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, एसआयटीचे प्रमुख बी. के. सिंग यांनी तपासाची संपूर्ण माहिती राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना दिली आहे.

700 महिलांचे राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र

लैंगिक शोषण प्रकरणात आरोप असलेल्या आमदार एच. डी. रेवण्णा यांना अपात्र ठरवावे, अशा आशयाचे पत्र 700 महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर केले आहे. विविध महिला संघटनांमधील महिलांनी हे पत्र तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच. डी. रेवण्णा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. प्रज्ज्वल यांच्याविरुद्ध वकील देवराजेगौडा यांनी तक्रार देऊनसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्यावतीने प्रचार करून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी जनतेला कोणता संदेश दिला आहे, असा प्रश्नही पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

 अपहरण झालेल्या महिलेचे एसआयटीकडून रक्षण

घरकाम करणाऱ्या महिलेच्या अपहरण प्रकरणी एफआयआर दाखल झाल्याने माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांची कोंडी झाली आहे. अपहरण झालेल्या महिलेचे एसआयटी अधिकाऱ्यांनी रक्षण केले आहे. सदर महिला म्हैसूर जिल्ह्याच्या हुणसूर  तालुक्यातील काळेनहळ्ळी येथे रेवण्णा यांचा स्वीय साहाय्यक राजशेखर याच्या फार्महाऊसमध्ये आढळली आहे. रेवण्णा यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय सतीश बाबू यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. एसआयटीच्या पथकाने शुक्रवारी रात्री सतीश बाबू याला अटक केली. त्यानेच रेवण्णा यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला म्हैसूरमध्ये नेले होते.

ब्ल्यू कॉर्नर नोटीसही जारी करणार?

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अटकेसाठी तातडीने हालचाली करा. लैंगिक शोषण प्रकरणात सहभागी असलेल्यांवर तडकाफडकी कारवाई करा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एसआयटी अधिकाऱ्यांना दिली. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपासंबंधी शनिवारी सिद्धरामय्या यांनी एसआयटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तपासाला विलंब करू नका, तपासात दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रज्ज्वल यांच्याविरोधात ब्ल्यूकॉर्नर नोटीस जारी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.