नेहरुंनी एडविनांना लिहिलेली पत्रे परत द्या
केंद्र सरकारची राहुल गांधी यांना सूचना, सोनिया गांधींकडे 51 पेट्या भरुन पत्रे असल्याची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ल्ली
जवाहरलाल नेहरु यांनी भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय माऊंटबॅटन यांच्या पत्नी एडविना यांना लिहिलेली पत्रे परत करावीत अशी सूचना केंद्र सरकारने राहुल गांधी यांना केली आहे. नेहरुंना एडविना आणि इतर अनेकांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रती सोनिया गांधी यांनी काँग्रेसप्रणित आघाडीच्या सत्ताकाळात सरकारकडून घेतलेल्या होत्या. अशा पत्रांच्या 51 पेट्या सोनिया गांधी यांनी नेलेल्या होत्या. सदर पत्रांना ऐतिहासिक महत्व असल्याने ती परत करावीत असे सरकारने स्पष्ट केले.
या पत्रसंचात जवाहरलाल नेहरु यांनी एडविना माऊंटबॅटन, थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन, जयप्रकाश नारायण आदी व्यक्तींना लिहिलेली पत्र, तसे त्यांच्याकडून नेहरु यांना आलेली पत्रे आहेत. ही पत्रे सोनिया गांधी यांनी नेलेली आहेत. केंद्र सरकार संचालित वस्तू संग्रहालय आणि वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष रिझवान काद्री यांनी ही मागणी केलेली आहे. 2008 मध्ये सोनिया गांधी यांनी ही पत्रे नेली होती, असे काद्री यांनी राहुल गांधी यांना पाठविलेल्या संदेशात स्पष्ट केले गेले आहे. हा संदेश 10 डिसेंबरला गांधी यांना पाठविण्यात आला आहे.
ऐतिहासिक ठेवा
ही पत्रे हा भारताचा ऐतिहासिक ठेवा आहे. या पत्रांपैकी बहुतेक सर्व पत्रे नेहरु यांनी त्यांच्या सर्वोच्च नेतेपदाच्या काळात लिहिली आहेत. एडविना माऊंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रांची माहिती माऊंटबॅटन यांच्या कन्येने लिहिलेल्या स्मृतीसंग्रहात देण्यात आली आहे. या पत्रांमध्ये नेहरुंनी पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा असफअली, बाबू जगजीवनराम आणि गोविंद वल्लभ पंत आणि इतरांना लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या पत्रांपैकी काही पत्रांमधला आशय सध्या बाहेर पडला आहे. तरीही, अनेक पत्रे गुप्त असून त्यांच्यातील मजकुरासंबंधी अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
नेहरु स्मृती न्यायाकडून नेली पत्रे
केंद्र सरकारसंचालित नेहरु स्मृती न्यासाला (नेहरु मेमोरियल ट्रस्ट) ही सर्व पत्रे दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांच्याकडून भेट देण्यात आली होती. नेव्हापासून ती या न्यायाच्या आधीन होती. 2008 मध्ये मनमोहन सिंग यांचे सरकार भारतात असताना सोनिया गांधी यांनी न्यायासाकडून ही पत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती. तथापि, आजपर्यंत ती परत देण्यात आलेली नाहीत. नेहरुंची ही खासगी पत्रे देशाच्या इतिहासाचा ठेवा असल्याने ती केंद्र सरकारच्या हाती असणे सुरक्षित ठरणार आहे. त्यामुळे ती परत देण्यात यावीत असे संदेशात स्पष्ट केले गेले आहे.
भाजपचा हल्लाबोल
या पत्रांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने सोनिया गांधी तसेच गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य घटना आणि लोकशाहीवर व्याख्याने झोडणाऱ्या सोनिया गांधी यांनी ऐतिहासिक ठेवा असणारी ही पत्रे मागवून घेतली आणि स्वत:जवळच ठेवून घेतली. ही पत्रे लपविण्याचे कारण काय आहे? या पत्रांमध्ये काँग्रेस अडचणीत येईल असा मजकूर आहे काय? याची शहानिशा होणे आवश्यक असून त्यासाठी ही पत्रे केंद्र सरकार संचालित संस्थेला परत करण्यात यावीत. काँग्रेसच्या काळात पुरावे कसे दडविले जात होते, याचे हे स्पष्ट उदाहरण आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमीत मालवीय यांनी केली आहे. ही पत्रे लपविण्यामागे काँग्रेसचा उद्देश काय आहे? विशेषत: नेहरुंनी एडविना माऊंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रात असा कोणता मजकूर आहे, की जो लपविण्याची वेळ काँग्रेसवर यावी, अशी पृच्छा त्यांनी केली. काँग्रेसची ही लपवाछपवी आता उघड झाली असून लोकांचा काँग्रेससंबंधी भ्रमनिरास झाला आहे, असा प्रतिहल्ला अमीत मालवीय यांनी चढविला आहे.