फ्रान्सचा फुटबॉलपटू गिरोडची निवृत्ती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
फ्रान्स फुटबॉल संघातर्फे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक गोल नोंदविणारा अव्वल फुटबॉलपटू ऑलिव्हियर गिरोडने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. 2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेनंतर गिरोडने आपल्या या निर्णयाने फुटबॉल शौकिनांना अनपेक्षित धक्का दिला आहे.
2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यफेरीच्या सामन्यात स्पेनकडून फ्रान्सला 2-1 अशा गोल फरकाने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे फ्रान्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. 37 वर्षीय गिरोड या पराभवामुळे खूपच नाराज झाला आणि त्याने फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. युरो चषक फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फ्रान्सला जेतेपद मिळवून देण्यासाठी त्याचे स्वप्न होते, पण ते अपुरे राहिले. गिरोडने अर्सेनल आणि चेल्सी फुटबॉल क्लबकडून अनेक सामने खेळले आहेत. फ्रान्सतर्फे गिरोड सर्वाधिक गोल नोंदविणारा फुटबॉलपटू आहे. त्याने 137 सामन्यात फ्रान्सचे प्रतिनिधीत्व करताना 57 गोल नोंदविले आहेत. फुटबॉल क्षेत्रामध्ये आतापर्यंत फ्रान्सतर्फे सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गिरोड तिसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वी ह्युगो लोरीस आणि लिलीयान थुर्रम हे फ्रान्सतर्फे सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटू आहेत. तब्बल 13 वर्षांच्या कालावधीत गिरोडने फ्रान्सच्या आघाडी फळीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. 2011 साली अमेरिका संघाविरुध्द गिरोडने पहिल्यांदा फ्रान्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2018 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघामध्ये गिरोडचा समावेश होता. फ्रान्सने क्रोएशिया अंतिम सामन्यात पराभव करुन विजेतेपद पटकविले होते. रशियात झालेल्या या स्पर्धेत गिरोडला एकही गोल नोंदविता आला नव्हता. पण त्यानंतर 2022 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत त्याने उपांत्य सामन्यात चार गोल नोंदवून फ्रान्सला अंतिम फेरीत नेले होते. पण अंतिम सामन्यात अर्जेटिनाकडून फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.