विराट ऊर्जास्रोताची निवृत्ती!
कालचा सोमवार हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक भावनिक आणि अविस्मरणीय दिवस ठरला. विराट कोहली, ज्याने 14 वर्षे कसोटी क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने, नेतृत्वाने आणि जिद्दीने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले, अजूनही करू शकला असता त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ही घोषणा क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक ठरली. तीनच दिवसांपूर्वी रोहित शर्माने आणि नंतर बीसीसीआयने विराटने निवृत्ती घेऊ नये अशी जाहीर विनंती करूनही त्याने ती ऐकली नाही हे धक्कादायक आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील एक विचार, एक प्रेरणा आणि एक युग संपले आहे. 2011-12 मध्ये सचिनने एका प्रश्नाला उत्तर देताना आपले विक्रम विराट आणि रोहित मोडतील असा विश्वास व्यक्त केला होता. त्या दोघांनी निवृत्ती घेतली. विराट हे विक्रम मोडू शकला असता. सचिन प्रमाणेच तो मैदानावर आहे तोवर भारत जिंकण्याची आशा आहे असे मानले जायचे. असा दुसरा खेळाडू नसताना तो बाहेर पडतोय. एकदिवसीय क्रिकेटची संख्या घटत असताना विराट आणि रोहितनी केवळ ते सामनेच खेळण्याची घोषणा करणे म्हणजे 2027 चा विश्वकप खेळण्यास ते उपलब्ध असतील असा भारतीय क्रिकेट रसिकांचा श्रध्दा भाव त्यांनी जपावा अशी चाहत्यांची इच्छा आहे ज्याला त्यांनी धक्का देऊ नये. सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली अशा तेजतर्रार कर्णधार मंडळींनी भारतीय क्रिकेटला शिखरावर पोहोचवले आणि आज जगात भारतीय क्रिकेटचा दबदबा निर्माण केला आहे. गांगुली आणि धोनी यांचा उत्तराधिकारी असलेल्या विराट कोहलीची कसोटीमधून निवृत्ती ही केवळ एका खेळाडूची निवृत्ती नाही, तर क्रिकेटमधील एका युगाचा अंत आहे. त्याने भारतीय क्रिकेटला विदेशात यश मिळवण्याची स्वप्ने दाखवली, फिटनेस आणि आक्रमकतेला नवे मापदंड दिले आणि कसोटी क्रिकेटला सन्मान मिळवून दिला. क्रिकेटमध्ये त्याच्या जागी कोणीही लगेच येऊ शकणार नाही, पण त्याने रचलेल्या मार्गावरून नवे खेळाडू पुढे जातील. त्यादृष्टीने विराट एक प्रेरणा, एक प्रवाह आणि एक आदर्श आहे जो सचिन तेंडुलकरकडून प्रेरणा घेऊन भारतीय संघात पोहोचला आणि त्याने 123 कसोटी सामन्यांत 9230 धावा आणि 30 शतके केली. त्याने परदेशात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा कठीण खेळपट्ट्यांवर यशस्वी खेळी करून भारतीय क्रिकेटला नवी उंची दिली. यापूर्वी विदेशात मालिका जिंकणे हे भारतीय संघासाठी स्वप्नवत होते. पण कोहलीच्या नेतृत्वाने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 40 कसोटी सामने जिंकले, जो कोणत्याही भारतीय कर्णधारामध्ये एक विक्रम आहे. त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा यांसारख्या वेगवान गोलंदाजांचा एक असा संघ घडवला, ज्याने विदेशात प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारली. कोहलीने फिटनेसला प्राधान्य देऊन भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली आणि आक्रमकता, आत्मविश्वास आणि विजिगीषु वृत्ती यांचा पाया रचला. कोहलीच्या निवृत्तीमागे केवळ वय,
फॉर्म किंवा फिटनेस हे कारण नाही. गेल्या काही वर्षांत बीसीसीआयशी त्याचे संबंध तणावपूर्ण राहिले. 2021 मध्ये त्याला एकदिवसीय कर्णधारपद गमवावे लागले, टी-20 कर्णधारपद त्याने स्वत: सोडले आणि कसोटी कर्णधारपदावरूनही त्याला पायउतार व्हावे लागले. 2020 नंतर त्याचा कसोटी फॉर्म काहीसा ढासळला होता, पण 2023 मध्ये त्याने 50 पेक्षा जास्त सरासरीने शानदार पुनरागमन केले. तरीही, संघनिवडीच्या प्रक्रियेत आणि त्या नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये त्याला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला, ज्यामागे संस्थात्मक दबाव आणि राजकारणाचा हात असू शकतो. कोहलीची तुलना नेहमीच जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्याशी झाली. जो रूटने 135 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांत 12 हजारहून अधिक धावा, स्मिथने 100 सामन्यांत 9500 वर धावा, तर विल्यमसनने 95 हून अधिक सामन्यांत 8500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोहलीच्या 9230 धावा या तुलनेत थोड्या कमी असल्या तरी त्याचा प्रभाव या आकड्यांपेक्षा खूप मोठा आहे. स्मिथची तांत्रिक स्थिरता, रूटची सातत्यपूर्ण खेळी आणि विल्यमसनची शांत जिद्द या साऱ्यांचा संगम कोहलीत दिसतो. त्यात त्याची आक्रमकता आणि सामना फिरवण्याची क्षमता त्याला वेगळी ओळख देते.
कोहलीने कठीण परिस्थितीत खेळी करून दाखवली. मग ती 2014 मधील अॅडलेडमधील 141 धावांची खेळी असो किंवा 2018 मधील इंग्लंडविरुद्ध 149 धावांची लढवय्या खेळी. त्याची नेतृत्वशैली आणि मैदानावरील ऊर्जा यांनी त्याला समकालीन खेळाडूंमध्ये वेगळे स्थान मिळवून दिले. कोहलीच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघासमोर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रोहित शर्मा आधीच निवृत्त झाला असून, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघात स्थान नाही. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत हे नवे खेळाडू प्रतिभावान असले तरी त्यांच्याकडे अजून अनुभवाची कमतरता आहे. कोहलीच्या नेतृत्वाने भारतीय संघाला एक आक्रमक आणि विजिगीषु शरीरभाषा मिळाली होती, जी आता टिकवणे आव्हानात्मक आहे. कसोटी क्रिकेटमधील स्थिरता आणि दबाव झेलण्याची क्षमता कोहलीच्या खेळीतून दिसायची. त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी गिल आणि पंत यांच्यावर येईल, पण कोहलीसारखा ‘मॅच-विनर’ आणि संघाला प्रेरणा देणारा खेळाडू शोधणे कठीण आहे. नव्या कर्णधाराला मग तो जसप्रीत बुमराह असो वा अन्य कोणी कोहलीने घालून दिलेल्या मार्गावरून पुढे जावे लागेल. कोहलीने भारतीय क्रिकेटला जे दिले, त्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे. यशस्वी जैस्वालने आधीच विदेशात शतके ठोकून आपली क्षमता दाखवली आहे. शुभमन गिल आणि ऋषभ पंतही पुढे येत आहेत. पण कोहलीच्या नेतृत्वातील सर्वात मोठा गुण संघाला एकत्र बांधणे आणि परिस्थितीला तोंड देण्याची जिद्द हे नव्या खेळाडूंना आत्मसात करावे लागेल. कोहलीने फिटनेस आणि व्यावसायिक दृष्टिकोनाला प्राधान्य देऊन भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलली. ही संस्कृती टिकवणे आणि विदेशात सातत्यपूर्ण कामगिरी करणे हे नव्या खेळाडूंसमोरील आव्हान आहे.