For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पी.आर.श्रीजेशकडून निवृत्तीची घोषणा

06:38 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
पी आर श्रीजेशकडून निवृत्तीची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

भारतीय हॉकी संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ हॉकीपटू व गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकनंतर आपण आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

36 वर्षीय पी. आर. श्रीजेश हा भारतीय हॉकी संघातील ज्येष्ठ आणि अनुभवी हॉकीपटू म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या 18 वर्षांच्या हॉकी कारकिर्दीत भारतीय संघाच्या यशामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याने 328 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आपल्या वैयक्तिक हॉकी कारकिर्दीत त्याने अनेकवेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. पॅरिस ऑलिंपिक ही त्याच्या हॉकी कारकिर्दीतील चौथी ऑलिंपिक स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी गेल्या काही दिवसांपासून आपण सरावावर अधिक दिला असून यावेळी भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिंपिक  स्पर्धेत निश्चित दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास श्रीजेशने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.

Advertisement

हॉकी इंडिया, हॉकी शौकिन, संघाचा प्रशिक्षकवर्ग तसेच कुटुंबिय सदस्यांनी आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल आपण या सर्वांचे ऋणी असल्याचे श्रीजेशने म्हटले आहे. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघ गेल्या ऑलिंपिक स्पर्धेत मिळविलेल्या कास्य पदकाचा रंग यावेळी निश्चित बदलेल, असेही त्याने म्हटले आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कास्य पदक पटकाविले आहे.

2006 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पी. आर. श्रीजेशने आपले आंतरराष्ट्रीय हॉकी संघात पदार्पण केले. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, 2018 च्या जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत कास्य पदक, त्याच प्रमाणे 2018 साली आशिया चॅम्पियन्स करंडक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये श्रीजेशचा समावेश होता. भुवनेश्वरमध्ये 2019 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या हॉकी सिरीज फायनल्समध्ये भारताने विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत श्रीजेशची कामगिरी दर्जेदार झाली होती. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघातील श्रीजेशच्या भक्कम गोलरक्षणामुळे हे यश मिळविता आले.

2024 ची पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा ही श्रीजेशच्या हॉकी कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असून या स्पर्धेत भारतीय हॉकी संघ आणखी एक पदक मिळवून श्रीजेशला शानदार भेट देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने दिली आहे. 2016 साली कनिष्टांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारताने जिंकली होती. या स्पर्धेत श्रीजेशची कामगिरी तसेच इतर खेळाडूंना मिळालेले प्रोत्साहन आजही आमच्या सदैव स्मरणात राहिल, असेही हरमनप्रित सिंगने म्हटले आहे. श्रीजेश हा केरळचा रहिवासी आहे. 2021-22 च्या प्रो हॉकी लिग स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळविले होते. भारतीय संघाच्या या यशामध्ये श्रीजेशचा वाटा महत्वाचा ठरला.  2021 साली पी. आर. श्रीजेशला मेजर ध्यानचंद ‘खेलरत्न’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. तसेच त्याने 2021 आणि 2022 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कारही मिळविला आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये श्रीजेशचा समावेश होता. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी पी. आर. श्रीजेशच्या हॉकी क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करुन त्याचे खास अभिनंदन केले आहे. हॉकी इंडियाने पी. आर. श्रीजेशच्या निवृत्तीच्या निर्णयाचा आदर केला आहे. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाच्या मोहिमेला 27 जुलैपासून प्रारंभ होत आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना 27 जुलैला न्यूझीलंडबरोबर, दुसरा सामना 29 जुलै अर्जेंटिनाबरोबर, तिसरा सामना 30 जुलै आयर्लंडबरोबर, चौथा सामना 1 ऑगस्टला बेल्झियमबरोबर तर पाचवा सामना 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. भारतीय हॉकी संघ सध्या स्वीसमध्ये सरावासाठी राहिला असून या सरावानंतर भारतीय हॉकी संघ पॅरिसमध्ये दाखल होईल.

Advertisement
Tags :

.