विविध सरकारी विभागातील कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा
ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियनची मागणी : राज्यभरातील एक हजाराहून अधिक कामगारांचे आंदोलन
बेळगाव : सध्या सरकारच्या अनेक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने तसेच आऊट सोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच त्यांना कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने या सर्व कामगारांना नोकरीमध्ये कायम करावे, अशी मागणी ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (एआययुटीयुसी) या संघटनेच्यावतीने राज्य सरकारकडे आंदोलनाद्वारे करण्यात आली.
राज्य सरकारच्या एकूण 43 विभाग व महामंडळांमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कंत्राटी-आऊटसोर्सद्वारे 3 लाखाहून अधिक कामगार कार्यरत आहेत. आरोग्य, वैद्यकीय संस्था, ऊर्जा विभाग, रुग्णालय, विद्यापीठ, समाज कल्याण, शिक्षण, मागासवर्गीय-अल्पसंख्याक, अनुसूचित जमाती, सिंचन, वाहतूक, वन विभाग यासह स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत कार्यालय यासह विविध कार्यालयांमध्ये हे कामगार कार्यरत आहेत. कंत्राटी पद्धतीने म्हणून या लाखो कामगारांचे एजन्सीकडून पिळवणूक होत आहे. त्यांना किमान वेतन, पीएफ, ईएसआय, रजा वेतन यासारख्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
नोकरीमध्ये कायम करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. अनेक कामगार आता निवृत्तीजवळ आले असल्याने त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी राज्यभरातील एक हजाराहून अधिक कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. जोवर न्याय मिळणार नाही तोवर आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.