पानमसाला पॅकवर रिटेल किंमत सक्तीची
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पान मसाला पॅकवर रिटेल किंमत प्रसिद्ध करण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. हा नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पानमसाला पॅकचा आकार किंवा वजन कितीही असले तरी हा नियम पाळावाच लागणार आहे. अन्यथा नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे केंद्र सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वीच्या नियमानुसार पानमसाल्याच्या छोट्या पॅकवर अशी किंमत मुद्रित करण्याची सक्ती नव्हती. तथापि, आता हा जुना नियम रद्द करण्यात आला असून कोणत्याही आकाराच्या पॅकवर किरकोळ विक्रीची किंमत मुद्रित करावीच लागणार आहे. किमतीप्रमाणेच नियमानुसार या उत्पादनाची इतर आवश्यक माहितीही मुद्रित करावी लागणार आहे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी दिल्या गेलेल्या सवलतीचा दुरुपयोग करण्यात आल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला. ज्या पॅकचे वजन 10 ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षाही कमी असेल त्यांच्यावरही ही सक्ती करण्यात आली असून तिचे उल्लंघन केल्यास उत्पादकांना कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.
किमतीची सक्ती का...
पानमसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर किरकोळ विक्रीची किंमत सक्तीची करण्याचा निर्णय योग्य विचाराअंती घेण्यात आला आहे. काही पानमसाला उत्पादक सरकारने दिलेल्या सवलतीचा दुरुपयोग करुन अधिक किमतीला तो विकत असल्याचे दिसून आले होते. पाकिटावर किंमत नसल्याने दुकानदार मनमानी किमतीला विक्री करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही प्रकरणे ग्राहक न्यायालयातही पोहचली आहेत. अशा स्थितीत नियमांची सक्ती केल्यास ग्राहकांची फसवणूक टाळता येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने हा नवा कठोर नियम करण्यात आला.