चार राज्यांचा निकाल, महाराष्ट्रावर परिणाम!
लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीपैकी चार राज्यांचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरदेखील भविष्यात परिणाम होणार असून कसबा विधानसभा पोटनिवडणूक आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हुरळून गेलेल्या काँग्रेसला तसेच इंडिया आघाडीतील भाजपचा सगळ्यात प्रमुख विरोधीपक्ष जो कधीकाळी सख्खा मित्रपक्ष होता त्या शिवसेना ठाकरे गटालादेखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव झाल्यानंतर कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली. या टीकेला भाजपने लोकसभेची सेमीफायनल (चार राज्यांच्या विधानसभा निवडणूका) जिंकत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या चार राज्यांचा निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही भविष्यात परिणाम होणार आहे. कारण गेल्या चार वर्षात कधी नव्हे त्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुट असो. गेली 4 वर्षे महाराष्ट्रातील राजकारण हे नेहमीच संभ्रमाचे आणि संशयाचे राहिले. शिवसेनेत फुट पाडण्यात यशस्वी झाल्यानंतर भाजप नेतृत्वाला उरलेली शिवसेना म्हणजे उध्दव ठाकरे आपल्यासोबत येतील असा भाजपचा कयास होता. मात्र उध्दव ठाकरेंनी पहिल्या दिवशी भाजपला केलेला विरोध आजही कायम आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेत सरकार स्थापन केले मात्र शिंदेंचा भाजपला किती फायदा झाला? हे पाहण्यासाठी 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निकालाचीच वाट पहावी लागेल. शिंदे भाजपसोबत गेल्यानंतर राज्यात तीन विधानसभा पोटनिवडणूका झाल्या त्यापैकी भाजपने दोन जागांपैकी एक चिंचवडची त्यांचीच जागा राखली तर भाजपची हक्काची असलेली कसबा ही गमावली तर अंधेरी पूर्व येथे शिवसेनेविरोधात भाजपने सुरूवातीला अपक्ष उमेदवार दिला, मग त्याची उमेदवारी मागे घेतली मग मतदारांना नोटांना मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र तरीही मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने ही पहिली निवडणूक जिंकली. एकनाथ शिंदेंनी मात्र धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर या चिन्हावर आजपर्यंत कोणती विधानसभा किंवा लोकसभा अशी महत्त्वाची निवडणूक लढविल्याचे अजून तरी माहीत नाही. त्यातच कसबा आणि कर्नाटक विधानसभा विजयानंतर काँग्रेसचा आवाज इतका वाढला की पुण्यात गिरीश बापट यांच्या निधनानंतर काँग्रेसच ही जागा लढवणार अशी घोषणा तर कधी मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असल्याचा वारंवार इशाराच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत असत. कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गिरीश बापट आणि बाळू धानोरकर या खासदारांचे निधन झाले मात्र या जागांच्या पोटनिवडणूका घेण्यापासून भाजपने पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला, इतकेच काय राज्यात सध्या सर्वच महापालिकांवर प्रशासक आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीतही कधी नव्हे ते राजकारण करण्यात आले. त्यामुळे देशात काहीही झाले तरी महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईलच असे नाही. दुसरे कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता येते तेव्हा डी शिवकुमार हे तिथे काँग्रेसचे हनुमान होतात तर कालच तेलंगणाला काँग्रेसला मिळालेल्या यशाच्या मागे रेवंत रेड्डीच्या संघर्षाची वाहवा केली जाते. महाराष्ट्र काँग्रेसकडे असा कोणी नेता नाही जो राज्यात संघर्ष करू शकेल? उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे) गटाच्या तुलनेत गेल्या अडीच वर्षात काँग्रेसच्या एकाही नेत्याला ना तुरूंगात जावे लागले ना ईडीच्या कारवायांना सामोरे जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ सत्ता आल्यावर पदांसाठीच काय तो संघर्ष इथले काँग्रेस नेते करताना दिसतात.
चार राज्यांच्या निवडणूकांचा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार का? तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून उत्तर भारतात जरी हिंदुत्वाचा मुद्दा चालत असला तरी पुरोगामी महाराष्ट्रात धर्मापेक्षा विकासाच्या राजकारणालाच नेहमी लोकांनी पसंती दिली आहे. त्यातच महाराष्ट्रात एकहाती सत्ता कोणालाच गेल्या 30 वर्षापासून मिळाली नाही, जे कालच्या निकालात 3 राज्यात भाजपला तर एका राज्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. मात्र महाराष्ट्रात मोदी लाट असताना देखील एकहाती सत्ता आली नाही, कारण महाराष्ट्रात भाजपचा तसा राज्यव्यापी नेता नाही. आज भाजपचे जे आमदार आहेत, त्यातील बहुतांश आमदार हे काँग्रेस -राष्ट्रवादीतील आहेत. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी मजबूत होत असताना भापजने पहिल्यांदा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सरकार बनवले पण एप्रिल 2023 च्या दरम्यान भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद घटेल असा अहवाल दिल्याच्या चर्चांनंतर भाजपने महाराष्ट्रात लोटस 2 ऑपरेशन सुरू केले आणि 2 जुलै 2023 ला अजित पवार आपली टीम घेऊन भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी झाले असले तरी आता कसबा आणि त्यानंतर कर्नाटक विधानसभा निकालानंतर बॅकफुटवर गेलेल्या राज्यातील भाजपला चार राज्यात मिळालेल्या यशानंतर मुठभर मांस वाढले आहे. भाजपला मिळालेले हे यश भविष्यात भाजपसोबत युतीत असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचेच आहे, कारण आता ज्या पध्दतीने भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांनी स्विकारले आहे, ते बघता भाजपकडून 48 जागांवर उमेदवार देताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना कमळ या चिन्हावरच निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जाईल. तसेच या दोन्ही नेत्यांची बार्गेनिंग पॉवरच भविष्यात पध्दतशीरपणे भाजपकडून कमी केली जाईल. त्यामुळे भाजपच्या मिळालेल्या यशाने जितके विरोधकांचे टेन्शन वाढले आहे, तसेच मित्रपक्षांचे वाढले आहे. मात्र जोपर्यंत लोकसभा निवडणूक होत नाही तोवर भाजप या दोन्ही मित्रांना सोडणार नाही कारण लोकसभेला महाराष्ट्रातून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपने 45 प्लसचा नारा दिला आहे. ज्या काँग्रेसचा राज्यात 2019 लोकसभेला केवळ एक खासदार निवडून आला होता त्याच काँग्रेसने कर्नाटक आणि कसबा निवडणूक निकालानंतर गिरीश बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदार संघावरदेखील दावा केला होता. त्यामुळे सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसलादेखील या निकालामुळे चाप बसणार आहे.
प्रवीण काळे