मंगाईदेवी यात्रोत्सवात पशुबळीला निर्बंध : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांच्या निवेदनाची दखल
बेळगाव : वडगाव श्री मंगाईदेवी यात्रेमध्ये मंदिराच्या आवारात पशुहत्या करण्यात येऊ नये, अथवा मंदिरावर कोणत्याही प्रकारचे प्राणी-पक्षी उडविण्यात येऊ नये, यावर निर्बंध घालण्यात आले आहे. कर्नाटक पशुबळी निषेध कायद्यांतर्गत निर्बंध घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे. श्री मंगाईदेवी यात्रा दि. 30 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेमध्ये पशुबळी देण्यात येऊ नये, तसेच मंदिरावर प्राणी-पक्षी उडविण्यात येऊ नयेत यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी यांनी दि. 29 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक पशुबळी निषेध कायदा 1959 आणि दुरुस्ती कायदा 1975 अंतर्गत वडगाव येथे मंगाईदेवीच्या यात्रेच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या पशुबळीला निर्बंध घालण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने पशुबळी रोखणे योग्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी पशुबळी निषेध कायद्यांतर्गत आदेश जारी केला आहे. श्री मंगाईदेवी मंदिराच्या आवारासह वडगाव व्याप्तीमध्ये भक्तांनी व नागरिकांनी देवाच्या नावाने कोणत्याही प्राण्याचा बळी देऊ नये, यावर निर्बंध घालण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेशात नमूद केले आहे.