मेरशी खारफुटीची जमीन पूर्वपदावर आणा
उच्च न्यायालयाचा मेरशी कोमुनिदादला आदेश: खारफुटींना धोका असल्याचा केला होता दावा
पणजी : मेरशी येथील खारफुटी असलेल्या खाजन जमिनीत बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेला मातीचा भराव काढण्यासाठी काम हाती घेऊन आणि सदर जमिनीचे सर्वेक्षण करून जमीन पूर्वपदावर आणण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. एम. एस. कर्णिक आणि न्या. निवेदिता मेहता यांनी कोमुनिदादला दिला आहे. पणजी ते बांबोळी जाताना डाव्या बाजूला असलेल्या मेरशी येथील खारफुटी असलेल्या खाजन जमिनीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे भराव टाकून ती जागा बुजवून टाकल्याप्रकरणी 2018 साली खारफुटींना धोका पोचत असल्यासंबंधी जनहित याचिका दाखल झाली होती. याप्रकरणी स्थानिक कोमुनिदाद, वन खाते, जिल्हाधिकारी, गोवा किनारी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरण आणि मेरशी पंचायतीला प्रतिवादी करण्यात आले होते.
सुनावणीवेळी स्थानिक कोमुनिदादच्या वकिलांनी बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेला मातीचा भराव काढण्यासाठी काम हाती घेतले असल्याचे सांगितले. मात्र सदर जमिनीच्या सर्व्हे क्रमांकाबद्दल अडचण येत असल्याचे नमूद केले. त्यावर कोमुनिदादने सरकारी सर्व्हे खात्याला कळवून जमिनीचे सर्वेक्षण करून जमीन पूर्वपदावर आणण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच विशेष तपास पथकाच्या नोडल अधिकाऱ्यानाही मदत करण्यास सांगण्यात आले. येथील जागेत सार्वजनिक बांधकाम खात्याने गणेश विसर्जनासाठी उभारलेली तात्पुरती शेड आणि प्लॅटफॉर्म काढण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांच्या भावना ओळखून त्यासाठी पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाणार असल्याचे आश्वासन अॅड. जनरल देविदास पांगम यांनी दिले.