कारवार-मडगाव दरम्यान ठप्प झालेली बससेवा पूर्ववत करा
चर्चा करून तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
कारवार : रोजगारासाठी गोव्याला ये-जा करणाऱ्यांसाठी बस सुविधा नसल्यामुळे कारवारमधील युवक अडचणीत आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांची युवकांनी भेट घेऊन कारवार-मडगाव ठप्प झालेली बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. कारवार तालुक्यातील शेकडो युवक दरदिवशी नोकरी आणि व्यवसायानिमित्त ये-जा करतात.यापूर्वी गोव्याला जाण्यासाठी सकाळी पावणे आठ वाजता आणि सव्वाआठ वाजता अशा दोन बसेस होत्या. तथापी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या महिलांसाठी मोफत बसप्रवासामुळे कारवार-मडगाव बससेवा बंद ठेवली आहे. सरकारच्या गॅरंटीमुळे परिवहन महामंडळाने या बसेसची व्यवस्था अन्यत्र केली आहे. त्यामुळे येथील युवकांची मोठी अडचण झाली आहे. जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांची भेट घेऊन कारवार-मडगाव दरम्यानची बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मानकर यांनी निवेदन स्वीकारून महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंजु नाईक, अक्षय तारीकर, विनायक नाईक, सुनील हळदणकर, चंद्रकांत गडकर, मंजुनाथ, राजेश आदी उपस्थित होते.