बेळगाव-बेंगळूर विमानफेरी पूर्ववत करा
खासदारांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी, उडानलाही मुदतवाढ द्या
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर सकाळच्या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही इंडिगो एअरलाईन्सने 27 ऑक्टोबरपासून विमानफेरी बंद करणार आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होणार असून विमानफेरी पुन्हा सुरु करावी अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री के. आर. नायडू यांच्याकडे केली. बुधवारी शेट्टर यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन उडान संदर्भातही मुदतवाढ देण्याची मागणी केली. बेळगाव-बेंगळूर विमानफेरीला मागील वर्षभरात 82 टक्के प्रतिसाद मिळून देखील विमानफेरी बंद करण्यात येत आहे. यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूरहून बेळगावला येणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर पुणे, चेन्नई, लखनौ, कोचीन, म्हैसूर, सुरत, मुंबई या शहरांना विमानसेवा सुरू करण्याबरोबरच बेंगळूर येथे एअरबस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. उडान-3 योजनेची पुढील 10 वर्षांसाठी अंमलबजावणी करावी. तसेच यामध्ये बेळगावचाही समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी शेट्टर यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली. सध्या मुदत संपल्याने विमानफेरी बंद करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात नवीन विमाने इंडिगोकडे दाखल होताच विमानफेरी पूर्ववत केली जाईल असे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.