रोबोटकडून चालविले जाते रेस्टॉरंट
बटन दाबताच 48 सेकंदात मिळतात गरम खाद्यपदार्थ
एक असे रेस्टॉरंट आहे, जेथे ऑर्डरसाठी केवळ एक बटन दाबावे लागते आणि 1.4 डॉलर्स म्हणजेच 120 रुपयांमध्ये तुम्हाला त्वरित खाद्यपदार्थ तयार करून सर्व करण्यात येतात. येथे टिप देण्याची देखील कुठलीच गरज नाही. दक्षिणपूर्व चीनच्या शेन्जेन शहरात असलेले छोटेसे फ्यूचर नूडल रेस्टॉरंट पूर्णपणे ऑटोमॅटिक असून येथे प्रत्येक गोष्टीसाठी रोबोटिक्सचा वापर केला जातो. या रेस्टॉरंटमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात, जे रोबोटकडून तयार केले जातात.
या ऑटोमॅटिक रेस्टॉरंटमध्ये केवळ 48 तासांत एक बाऊल नूडल्स मिळतात, ज्याची किंमत 9.9 युआन म्हणजेच 1.4 डॉलर्स आहे आणि याकरता कुठलीच टिप देण्याची गरज नाही. या ऑटोमॅटिक फूड सर्व्हिसचा अनुभव घेण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करत आहेत. मीट सूप नूडल्स आणि स्टिर-फ्राइड नूडल्ससोबत मॅरीनेटेड अंडी आणि ग्रिल्ड सॉसेज यासारखे खाद्यपदार्थ देखील येथील मेन्यूत सामील आहेत. याच्या किमती 6-20 युआनदरम्यान आहेत. कस्टम सेल्फ-सर्व्हिस कियोस्कच्या माध्यमातून स्वत:ची ऑर्डर देतात आणि पेमेंट करतात. तसेच एका ट्रान्सपरंट विंडोच्या माध्यमातून खाद्यपदार्थ तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया पाहत असतात.
रोबोट मळतो पीठ
येथे रोबोट पाणी अन् पिठाला मिसळतो, पीठ मळतो आणि त्याला गोल आकार देतो. तसेच नूडल्सच्या स्वरुपात वेगळे करत असतो आणि हे सर्वकाही 8 सेकंदांपेक्षाही कमी वेळेत होते. यानंतर मीट अन् नूडल्सला एका बाउलमध्ये टाकले जाते, गरम पाणी ओतण्यात येते आणि नूडल्स 40 सेकंदांत तयार होतात. अखेरीस एक रोबोटिक हँड नूडल्सचे वाफेने भरलेले बाऊल समोर करतो, ज्याच्यावर कापलेला कांदा पसरविला जाते. नूडल्स पूर्णपणे शिजले असून मीट देखील ताजे अन् सॉफ्ट असल्याचे एका ग्राहकाने म्हटले आहे.
नूडल्स तयार करणारी मशीन
नूडल्स तयार करणाऱ्या मशीनला विकसित करण्यास 10 वर्षे लागली तसेच प्रत्येक मशीनची किंमत 46 हजार डॉलर्स आहे. 20 हून अधिक प्रकारच्या ब्लेड्सनी सुसज्ज ही मशीन केवळ 8 सेकंदात विविध आकाराचे नूडल्स तयार करत असल्याचे या रेस्टॉरंटच्या एका प्रतिनिधीने सांगितले आहे.
अनेक कारणांकरता रोबोट्सचा वापर
2015 मध्ये ब्रिटिश टेक कंपनी मोली रोबोटिक्सने जगातील पहिला रोबोटिक शेफ सादर केला होता. हा रोबोट साधारण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. जानेवारी महिन्यात पूर्व चीनच्या शांदोंगमध्ये माउंट ताई येथे एक रोबोटिक एक्सोस्केलेटन सादर करण्यात आला होता. याच्या मदतीने पर्यटकांना देशातील सर्वात आव्हानात्मक पर्वतावर चढण्यास मदत झाली आहे. तर शेन्जेनमध्ये मानव रोबोटे तयार करण्यात आले असून ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत रस्त्यांवर गस्त घालत आहेत.