तृणमूल आमदाराकडून रेस्टॉरंट मालकाला मारहाण
पार्किंगवरून झाले होते भांडण, तक्रार दाखल
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील आमदार सोहम चक्रवर्ती यांनी एका रेस्टॉरंट मालकाला मारहाण केली आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पक्ष खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्यावर तेथे वाद निर्माण झाला. तर मारहाणीप्रकरणी रेस्टॉरंट मालक अनीसुल आलम यांनी आमदार चक्रवर्ती विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. स्वत:च्या संतापावर नियंत्रण न राखू शकल्याने आलम यांची माफी मागू इच्छितो असे आमदाराने म्हटले आहे.
एका रेस्टॉरंट परिसराबाहेर बंगाली अभिनेता आणि तृणमूलचा आमदार असलेले सोहम चक्रवर्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार पार्क केल्याने भांडण सुरू झाले होते. रेस्टॉरंटला अभिनेत्याशी संबंधित एका चित्रिकरणासाठी बुक करण्यात आले होते. पार्किंगच्या पूर्ण जागेत आमदार आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कार्स उभ्या करण्यात आला होत्या. त्यांना कार्स हटविण्यात सांगण्यात आल्यावर मारहाण करण्यात आल्याची तक्रार आलम यांनी नोंदविली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात तृणमूल आमदार चक्रवर्ती रेस्टॉरट मालकाला लाथाबुक्क्यांनी तुडवत असल्याचे दिसून येते.