For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून संसदेचे अधिवेशन

06:58 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजपासून संसदेचे अधिवेशन
Advertisement

पहिले दोन दिवस नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी : बुधवारी लोकसभा अध्यक्षांची निवड

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोदी मंत्रिमंडळ 3.0 च्या शपथविधी आणि खातेवाटपानंतर आता संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. हे सत्र सोमवार 24 जूनला सुरू होऊन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, सभापतींची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी 24 जून 2024 ते 3 जुलै 2024 या कालावधीत 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन बोलावले जात आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील. या चर्चेदरम्यान आक्रमक विरोधक विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात.

Advertisement

लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलैदरम्यान, तर राज्यसभेचे पहिले अधिवेशन 27 जून ते 3 जुलै या कालावधीत बोलावण्यात आल्याचे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. यामध्ये नवनिर्वाचित लोकसभा खासदारांना शपथ देण्यात येणार असून नवीन लोकसभा अध्यक्ष निवडण्याचे महत्त्वाचे कामही पूर्ण केले जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील आणि सभागृहाच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाचा समारोप 3 जुलै रोजी होणार आहे. या संक्षिप्त सत्रादरम्यान 27 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देतील.

18 व्या लोकसभेचे कामकाज 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीपासून सुरू झाले. लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे हे पहिले अधिवेशन असेल. यावेळी एनडीएकडे पूर्ण बहुमत असले तरी भाजप बहुमताने सत्तेत परतलेला नाही. लोकसभेत एनडीए सरकारच्या 293 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे 240 जागा आहेत. तर विरोधी आघाडी ‘इंडिया’कडे लोकसभेत 233 जागा आहेत.

दहा दिवसात आठ बैठका

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या 10 दिवसांत एकूण 8 बैठका होतील. सर्वप्रथम लोकसभेचे प्रोटेम स्पीकर (हंगामी अध्यक्ष) भर्तृहारी महाताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील. यानंतर ते सकाळी 11 वाजता लोकसभेत पोहोचतील. पहिल्या दोन दिवशी म्हणजे 24 आणि 25 जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील. त्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करतील. यानंतर पंतप्रधान मोदी बोलणार आहेत. 29-30 जून रोजी शनिवार-रविवारमुळे सुट्टी असणार आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव आणेल आणि त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधाना मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागू शकतो. गेल्या आठवड्यात झालेल्या नीट परीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमितता या आरोपांवरून विरोधक यावेळी गदारोळ माजवू शकतात.

काँग्रेसला 10 वर्षांनी विरोधी पक्षनेतेपद मिळणार

गेल्या दहा वर्षांपासून रिक्त असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद यावेळी काँग्रेसला मिळणार आहे. 2014 पासून कोणत्याही विरोधी पक्षाचे 54 खासदार (एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के) विजयी झालेले नसल्यामुळे हे पद रिक्त होते. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी लोकसभेच्या एकूण 543 खासदारांपैकी 10 टक्के म्हणजेच 54 खासदार असणे आवश्यक आहे. 16व्या लोकसभेत मल्लिकार्जुन खर्गे हे 44 खासदारांसह काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते, परंतु त्यांना विरोधी पक्षनेते हा दर्जा नव्हता. तर 17 व्या लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांनी 52 खासदारांचे नेतृत्व केले. मात्र, त्यांनाही ‘कॅबिनेट’ मंत्र्यांप्रमाणे अधिकार नव्हते.

Advertisement
Tags :

.