नवीन वर्षात रेस्टॉरंट, लॉजिंग दरात वाढ
कोल्हापूर :
रेस्टॉरंटसाठी लागणाऱ्या बाजारातील कच्च्या मालाच्या दरात 15 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दैनंदीन व्यावसायिक खर्च, त्याचबरोबर व्यावसायिक घरफाळा, लाईट बिल, पाणी बिल, कामगार पगार तसेच दुरूस्ती, देखभालीसाठी येणाऱ्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नवीन वर्षापासून जिल्हयातील रेस्टॉरंट, व लॉजिग दरात वाढ होणार आहे. कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या बैठकीत हा निर्णंय घेण्यात आला आहे. या बैठकीस सर्व सभासद उपस्थित होते.
जिल्हयातील रेस्टॉरंट व लॉजिंग व्यावसायिकांना सध्याच्या दरामध्ये व्यवसाय करणे अवघड झाले आहे. यामुळे सर्व व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या व लॉंजिगच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हयातील रेस्टॉरंट व लॉजिंग व्यावसायिकांनी एकमताने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबाजावणी नवीन वर्षात होणार आहे.
उतम दर्जा व चांगली सेवा देणे ही कोल्हापूरी खाद्यसंस्कृतीची व आदरतिथ्य क्षेत्राची पंरपरा आहे. ती टिकवण्यासाठी दरवाढ करणे अनिवार्यं आहे. याकरीता सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष उज्वल नागेशकर, उपाध्यक्ष सचिन शानभाग व सचिव सिध्दार्थ लाटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.