मोगणे अॅकॅडमी-कागल असोसिएशन अंतिम सामना
कोल्हापूर :
(कै) बाबा (विक्रमसिंह) भोसले ट्रॉफी टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेअंतर्गत मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये (कै.) अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अॅकॅडमी (अ) संघ व कागल तालुका क्रिकेट असोसिएशन या संघांनी प्रतिस्पर्धी संघांना पराभूत अंतिम फेरीत धडक दिली. राजाराम कॉलेज मैदानात दोन्ही सामने झाले. या सामन्यांमध्ये रणजीत निकमचे शतक तर विशाल कल्याणकर व रोहित पाटीलने अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला.
दरम्यान, (कै.) अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अॅकॅडमी (अ) संघ व शिवनेरी स्पोर्टस् यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. यामध्ये प्रथम फलदांजी करताना शिवनेरी स्पोर्टसने 20 षटकांत 5 बाद 163 धावा केल्या. रोहित पाटीलने 65, वैभव पाटीलने 42, अभिजीत लोखंडेने 15 व अथर्व शिंदेने 13 धावांचे योगदान दिले. गोलंदाजी करताना मोगणे अॅकॅडमीच्या संदीप पाटील, रचित चौगुले, श्रीराज चव्हाण, आतिष वरपे व सागर मेतके यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. प्रत्युत्तदाखल खेळताना मोगणे अॅकॅडमीने 17.4 षटकांतच चार गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा करत सामना 6 गडी राखून जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या विजयासाठी विशाल कल्याणकरने 51, सुरज कोंढाळकरने नाबाद 46, महेश मस्केने 32, आतीष वरपेने 16 व विशांत मोरेने 10 धावा केल्या. गोलंदाजीत शिवनेरी स्पोर्टस्च्या सौरभ कोटलगी, अभिषेक निषाद, तुषार पाटील व रोहीत पाटील यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला
कागल तालुका किक्रेट असोसिएशन व रमेश कदम क्रिकेट अॅकॅडमी यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. प्रथम फलदांजी करताना कागल तालुका असोसिएशनने 20 षटकांत 7 बाद 226 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये रणजीत निकमने शानदार शतक ठोकत केवळ 68 चेंडूत 165 तर रोहित मरळेने 34 धावांचे योगदान दिले. गोलंदाजी करताना कदम अॅकॅडमीच्या रोहन सावंत व चेतन नार्वेकर यांनी प्रत्येकी 2 बळी तर क्षितीज पाटीलने 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कदम अॅकॅडमीने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. परिणामी या संघाला 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कदम अॅकॅडमीच्या पराभवामुळे पार्थ गणबावलेने संयमी फलंदाजी करताना केलेल्या नाबाद 83 धावांसह रोहित गीरीच्या 33, प्रेम ननवरेच्या नाबाद 23, यतीराज पाटोळेच्या 22, चेतन नार्वेकरच्या 20 व करण वाघमोडेने 16 धावा केल्या. गोलंदाजी करताना अशितोष अंबपकरने 3, साद मुजावरने 2 बळी तर शाहरूख नायकवडीने 1 बळी घेतले.