भावना नव्हे, जबाबदारी : पवारांचा संदेश
अलीकडे पार्थ पवार यांच्या उघडकीस आलेल्या जमीन प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं, तर त्यावर शरद पवार पक्षातून दोन वेगळ्या प्रतिक्रिया आल्या. सुप्रिया सुळे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली मात्र शरद पवारांनी अत्यंत शांत, अनुभवसिद्ध आणि संयमी भूमिका घेत “आम्ही कुटुंब नव्हे, विचारधारा मानतो” असं सांगितलं. त्यांच्या या विधानाने केवळ या प्रकरणाचा सूर बदलला नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय मूल्यव्यवस्थेलाही एक विचारशील दिशा दिली. अर्थात पवारांची ही बाजू सर्वांनाच पटेल असे नाही पण एकवेळ अजित पवारांची पाठराखण करणारे शरद पवार आज विरोधी भूमिकेत आहेत तर कधीकाळी टोकाचा विरोध करणारे मुख्यमंत्री फडणवीस सध्या कात्रीत सापडले आहेत. राजकारणात नाती, सत्तासंघर्ष आणि विचारधारा या तिन्हींचा संघर्ष नवा नाही. पण शरद पवारांच्या राजकीय प्रवासाचं वैशिष्ट्या म्हणजे त्यांनी नेहमी ‘संयम’ आणि ‘संस्था’ या दोन गोष्टींना प्राधान्य दिलं. पार्थ पवार प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया याच तत्त्वाची झलक देणारी आहे. माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं “जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. मुख्यमंत्री म्हणत असतील की प्रकरण गंभीर आहे, तर त्यातील वास्तव त्यांनीच जाहीर केलं पाहिजे.” एवढं सांगून त्यांनी संपूर्ण जबाबदारी सरकारकडे सोपवली, आणि स्वत: कोणत्याही वादात न अडकता राजकीय परिपक्वतेचं उदाहरण ठेवले. याउलट सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया भावनिक आणि वैयक्तिक स्वरूपाची होती. त्यांनी आपल्या कुटुंबावर आरोप झाल्याने दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या भूमिकेतील वेदना समजण्यासारखी नाही आणि मान्यही करता येणार नाही. तुमच्या घराण्यातील कोणी आहे म्हणून असे करूच शकत नाही हा अंधविश्वास लोकांनी का ठेवावा? त्याची चौकशीची मागणी त्यांनी केली पाहिजे होती. कारण त्या एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करतात. शरद पवार यांचं राजकारण हे वैयक्तिक निष्ठेपेक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचं प्रतिक आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या नातवाचा आणि मुलीच्या विरोधातील उमेदवारीचा उल्लेख करून या विषयाचा संदर्भ दिला. “गेल्या निवडणुकीत माझा नातू अजित पवारांच्या आणि मुलगी पत्नीच्या विरोधात उभी होती हे त्यांनी आवर्जून सांगितले. राजकारण म्हणजे कुटुंबाचा विस्तार नसून जबाबदारीचा विस्तार आहे”, हे नेत्यांनी शिकलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं त्यांचं विधानही उल्लेखनीय आहे. “मुख्यमंत्र्यांनी जर प्रकरण गंभीर म्हटलं असेल, तर जनतेसमोर तथ्य त्यांनीच मांडावं,” हे सांगून त्यांनी लोकशाहीतील उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली. सत्ताधाऱ्यांची जबाबदारी केवळ कारवाई करण्यापुरती नसून, ती जनतेला माहिती देण्याचीही असते. सरकारने फक्त इतकं जाहीर करावं कोणती चौकशी सुरु आहे, कोणत्या संस्थेकडे आहे आणि ती कोणत्या टप्प्यावर आहे. हे सांगणं ही पारदर्शकतेची पहिली पायरी आहे. राज्याच्या राजकारणात अजित पवारांविरोधात पूर्वी कटु भाष्य करणाऱ्या अनेक नेत्यांनी आता त्यांच्याशी जवळीक दाखवायला सुरुवात केली आहे. सत्तासमीकरणं बदलली, तशी त्यांची वाणीही बदलली. पण शरद पवार यांच्या राजकारणात ही लवचिकता दिसत नाही. ते नेहमी स्थिर भूमिकेवर उभे राहतात. कधी सत्तेत, कधी विरोधात पण त्यांच्या विचारधारेची दिशा बदलत नाही. हीच गोष्ट त्यांना ‘जेष्ठ नेते’ बनवते. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार प्रकरण फक्त एक वैयक्तिक घटना राहात नाही. ते राजकारणातील नैतिकतेचा आणि जबाबदारीचा आरसा बनतं. शरद पवार यांची भूमिका सांगते की, राजकारणात नात्यांपेक्षा नीती महत्त्वाची असते. जो दोषी आहे त्याला चौकशीअंती शिक्षा व्हायलाच हवी; पण त्याबाबत निर्णय न्यायसंस्थेने आणि तपासयंत्रणांनीच घ्यायला हवा. नेता म्हणून आपलं मत देताना त्यांनी नेहमी ‘कायद्याच्या चौकटी’चं भान ठेवले. आजच्या काळात जिथे सोशल मीडियावर प्रतिक्रिया त्वरित आणि भावनिक येतात, तिथे पवार यांचा संयम अधिक ठळकपणे जाणवतो. त्यांनी कोणालाही दोष न देता, सरकारला त्याची जबाबदारी बजावण्याची आठवण करून दिली. अशा प्रकारची संतुलित भूमिका नव्या पिढीतील नेत्यांसाठी आदर्श ठरू शकते. भावनांना वाव द्यायचा नाही, पण संवेदनशीलतेचा आधार गमवायचाही नाही ही त्यांची राजकीय शिकवण आहे. याचबरोबर, त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांनाही एक राजकीय इशारा दिला आहे. आरोप केवळ विरोधकांवर नाहीत, तर सत्तेत असलेल्या कोणावरही असू शकतात. त्यामुळे “कायद्यापुढे सर्व समान” ही भूमिका सरकारने सार्वजनिकरीत्या मांडावी. लोकांचा विश्वास जपण्यासाठी ही पारदर्शकता अत्यावश्यक आहे. आज महाराष्ट्रातल्या राजकारणात गोंधळ, वैयक्तिक आरोप आणि सूडभावनेचा माहोल दिसतो. पण शरद पवार यांचं वय आणि अनुभव यामुळे त्यांचं प्रत्येक वाक्य सध्याच्या पिढीला दिशादर्शक ठरू शकतं. त्यांनी दाखवून दिलं की, नेता मोठा होतो तो सत्तेमुळे नव्हे, तर संकटात घेतलेल्या योग्य निर्णयामुळे. नव्या पिढीच्या राजकारण्यांनी त्यांच्या या भूमिकेतून शिकण्यासारखं बरंच आहे. सार्वजनिक आयुष्यात भावनिक ओढ, कौटुंबिक संबंध आणि राजकीय जबाबदारी यांच्यातील सीमारेषा जपणं सोपं नाही. पण हाच तो कस असतो ज्यावर खरा नेता घडतो. शरद पवार यांनी या प्रकरणात नेमका तोच कस पुन्हा उत्तीर्ण केला आहे. पार्थ पवार प्रकरणाच्या माध्यमातून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा नात्यांच्या चौकटीबाहेर येऊन विचारधारांच्या दिशेने वळताना दिसतं आहे. शरद पवार यांनी दाखवलेली तर्कशुद्ध, संस्थात्मक आणि जबाबदार भूमिका हीच आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला हवी असलेली दिशा आहे. त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाच्या नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या परिपक्वतेचं प्रतीक म्हणून काम केलं आहे. “आम्ही कुटुंब नव्हे, विचारधारा मानतो” या एका वाक्यात त्यांनी राजकारणाला भावनिकतेच्या पातळीवरून काढून नैतिकतेच्या पातळीवर नेलं. राज्य सरकारने आणि नव्या पिढीतील नेत्यांनी जर हीच शिकवण अंगीकारली, तर महाराष्ट्रात जबाबदारी, पारदर्शकता आणि मूल्यनिष्ठा या तिन्हींचा संगम नव्यानं घडू शकेल.