For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाची विश्रांती : नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत घट

11:22 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाची विश्रांती   नदी नाल्यांच्या पाणीपातळीत घट
Advertisement

चार दिवसांपासून केवळ अधूनमधून पावसाची रिमझिम : पाण्याखाली गेलेली पिके वाया : सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/किणये 

गेल्या महिन्याभरात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. पाण्याखाली गेलेली पिके कुजून वाया झाली आहेत. गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे नदीला नाल्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. केवळ अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू आहे. महिनाभर पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काही गावातील संपर्क रस्तेही बंद झाले होते. या पावसामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. तसेच नागरिकही गारठून गेले होते. अखेर चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुखावलेले आहेत. मात्र या पावसाच्या पाण्यात ज्या शेतकऱ्यांची पिके वाया गेलेली आहेत. ते शेतकरी मात्र सद्यस्थितीत चिंतेत आहेत.

Advertisement

तालुक्याच्या पश्चिम भागातील मुंगेत्री नदीलाही पूर आला होता. यामुळे संतिबस्तवाड जुन्या रस्त्यावरील पुलावर पाणी आले होते. पावसाचा जोर कमी झाला असल्यामुळे या पुलावरील पाणी पूर्णपणे कमी झाले असून सध्या वाहतुकीसाठी हा रस्ता खुला झालेला आहे. तसेच नदीच्या पाणी पातळीतही घट झाली असल्याचे दिसून येत आहे. शेत शिवारामध्ये पावसाचे व नदी नाल्याचे पाणी साचून भात व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नदीच्या काठालगत असलेले शेतकरी संकटात सापडलेले आहेत. मुसळधार पावसामुळे मच्छे, पिरनवाडी आदी भागातील नागरिकांच्या थेट घरामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे पंधरा ते वीस दिवस या नागरिकांना घरात शिरलेले पाणी काढताना बरीच तारांबळ उडाली होती. पावसाची उघडीप झाली आणि घरात येणारे पावसाचे कमी पाणी कमी झाले. यामुळे सदर कुटुंबातील सदस्यांना होणारा त्रास कमी झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिह्याचा दौरा केला होता. पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली तसेच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही खानापूरसह पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

राकसकोप धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. यामुळे मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. मार्कंडेय नदीला पूर आला. यामुळे बेळगुंदी, सोनोली  भागातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी साचलेल्या शिवारातील भात, रताळी व अन्य पिके कुजून गेली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. आपल्याला प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा सदर भागातील शेतकरी करत आहेत. मुसळधार पावसात मुंगेत्री नदी दुथडी भरून वाहत होती. अलीकडे चार दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे सध्यातरी या भागात नदीच्या पुराचा धोका टळलेला आहे. किणये, वाघवडे, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, इनाम बडस, बाकनूर, बेळवट्टी भागातील रताळी पिकामध्ये पाणी साचून पिकाचे नुकसान झालेले आहे. मागील महिन्याभरात नागरिकांना ऊन दिसले नाही. मात्र या चार दिवसात अधूनमधून काही ठिकाणी कडक ऊनही दिसून आले.

सध्या पिकांना वातावरण पोषक

जी भात, रताळी व इतर पिके पावसाच्या पाण्यात सापडली नाहीत किंवा साचून राहिली नाहीत. अशा पिकांसाठी सध्याचे वातावरण पोषक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कारण पावसानंतर उघडीप मिळाली तर पीक बऱ्यापैकी बहरून येते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.