पुढील आठवडाभरात जय किसान मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवा
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी एपीएमसीला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर पुढील आठवड्यापर्यंत जय किसान भाजीमार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. एपीएमसीमधील कार्यालयात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एमपीएमसी आणि जय किसान भाजीमार्केटमधील व्यापाऱ्यांची संयुक्तरित्या बैठक घेतली. एपीएमसीमधील गाळ्यांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, जय किसान भाजीमार्केटबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी तेथील व्यापाऱ्यांशी एपीएमसीमध्ये व्यवस्था करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना सूचना केली आहे.
दोन्ही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सुसंवाद साधून आपला व्यवसाय करावा, असे ते म्हणाले. जय किसान व्यापाऱ्यांच्या मागण्या तीन महिन्याच्या काळात सोडवू. गरज पडल्यास आम्ही नवीन गाळे बांधण्यास तयार आहोत. जर काही समस्या असतील तर त्या कृपया आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी आमदार आसिफ सेठ, बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, प्रांताधिकारी श्रवण नाईक, जि. पं. सीईओ राहुल शिंदे. एपीएमसीचे सचिव विश्वनाथ रेड्डी, शेतकरी नेते शिवणगौडा पाटील, केपीसीसी सचिव सुनील हणमण्णावर यांच्यासह जय किसान आणि एपीएमसीमधील व्यापारी उपस्थित होते.