कणबर्गी गावातील समस्या मार्गी लावा
मनपा आयुक्त शुभा बी. यांना ग्रामस्थांचे निवेदन
बेळगाव : कणबर्गी गावातील स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था, सरकारी शाळेच्या रस्त्यावर पथदीप बसविण्यासह गावातील इतर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी माजी महापौर शिवाजी सुंठकर व ग्रामस्थांनी मनपा आयुक्त शुभा बी. यांची भेट घेऊन दिले. निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर लवकरच समस्या सोडविल्या जातील, अशी ग्वाही मनपा आयुक्तांनी यावेळी दिली. गावच्या स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्याने अंत्यविधी आणि रक्षाविसर्जन करण्यासाठी गेलेल्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर सरकारी शाळेच्या रस्त्यावर पथदीप नसल्याने ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी अंधारातून ये-जा करावे लागत आहे.
टीसी हलविण्याची मागणी
तसेच गावातील कुंभार तलाव परिसरात कांही जणांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात गलिच्छ वातावरण निर्माण होण्यासह दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे भविष्यात कचऱ्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेतर्फे एखादी कचराकुंडी ठेवावी, तसेच धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याच्या आवारातील टीसी व मीटर अन्यत्र हलवावे, गावातील इतर समस्याही महापालिकेने लक्ष घालून सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना किसन सुंठकर, परशराम सुंठकर, महेश मुचंडीकर, जोतिबा काकतीकर, मल्लाप्पा घसारी, देवाप्पा अष्टेकर, प्रशांत मोदेकर, सुधीर यळ्ळूरकर, भवानी मालाई, भावकाण्णा भंडरगाळी, पिराजी बिळगोजी, विष्णू मोदेकर आदी उपस्थित होते.