For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिरॅमिक कामगार-शाहूनगर वसाहत यांच्यातील वादावर तोडगा काढू

12:03 PM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिरॅमिक कामगार शाहूनगर वसाहत यांच्यातील वादावर तोडगा काढू
Advertisement

प्रांताधिकारी श्रवण नाईक

Advertisement

खानापूर : येथील सिरॅमिक कामगार आणि शाहूनगर वसाहतीतील रहिवाशांचा जमिनीसाठी गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आहे. चार दिवसापूर्वी सिरॅमिक कामगार आपल्या जागेचा ताबा घेण्यासाठी गेले असता वादावादीचा प्रसंग निर्माण झाला होता. याची दखल पोलीस आणि तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी घेतली. याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी श्रवण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत श्रवण नाईक यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण आपण कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, आणि जागेसंदर्भात योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे या वादावर सध्या पडदा पडला आहे.

अधिक माहिती अशी की, येथील स्टेशनरोडवरील असलेल्या गायरान कमिटीची  सर्वेनंबर 93/1 ही जागा सिरॅमिक कारखान्यासाठी 99 वर्षे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. या ठिकाणी सिरॅमिक कारखाना चालविण्यात आला होता. यातील 138 कर्मचाऱ्यांचा प्राव्हीडंट फंड भरला नव्हता. याबद्दल कर्मचाऱ्यानी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना प्राव्हीडंट फंड देण्याचे आदेश दिले होते. कारखान्याच्या मालकांनी प्राव्हीडंट फंडऐवजी कर्मचाऱ्यांना भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे 138 कामगारांना 193/1 मधील 14 एकर 18 गुंठे जागा देण्यात आली होती. मात्र याच जागेवरील 1 एकर 38 गुंठ्यात शाहूनगर वसाहत वसविली आहे.

Advertisement

या कामगारांना जागेचा कब्जा देण्यास विरोध केला. यावरुन हा वाद चिघळला होता. चार दिवसापूर्वी सिरॅमिक कामगार आपल्या जागेचा ताबा घेण्यासाठी गेले असता वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला होता. याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना याबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी श्रवण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.

बैठकीला तहसीलदार गायकवाड, उपअधिक्षक रवि नाईक, मुख्याधिकारी संतोष कुरबेट, नगरपंचायत महसूल अधिकारी गंगाधर कांबळे, लक्ष्मण मादार, इरफान तालीकोटी, अॅड. सिद्धार्थ कपिलेश्वरी, अॅड. सुनिल काकतकर, अक्षय होसमणी, यल्लारी गावडा, संदीप पाटील यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रवण नाईक यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतले. कागदपत्रांचा पूर्णपणे अभ्यास करून आपण यावर तोडगा काढू, मात्र नागरिकांनी सामाजिक शांतताभंग होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.