मणिपूर राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा ठराव मंजूर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिने वाढवण्याचा संवैधानिक ठराव नुकताच लोकसभेमध्ये मंजूर झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संबंधित एक संवैधानिक ठराव मांडला. याअंतर्गत 13 फेब्रुवारी 2025 रोजी संविधानाच्या कलम 356 अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेला राष्ट्रपती राजवट 13 ऑगस्टपासून आणखी सहा महिने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपती राजवट आवश्यक आहे यावर गृहराज्यमंत्र्यांनी भर दिला. मंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहाने आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. यापूर्वी 2 एप्रिल रोजी लोकसभेने राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संवैधानिक प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
13 फेब्रुवारी 2025 रोजी संविधानाच्या कलम 356 अंतर्गत राष्ट्रपतींनी मणिपूरच्या संदर्भात जारी केलेल्या घोषणेस 13 ऑगस्ट 2025 नंतर सहा महिन्यांसाठी सुरू ठेवण्यास हे सभागृह मान्यता देते, असे ठरावात म्हटले आहे. सभागृहातील चर्चेला उत्तर देताना नित्यानंद यांनी मणिपूरमधील सद्यस्थितीची माहिती दिली. आरक्षणाशी संबंधित उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून राज्यात हिंसाचार पसरला होता. हा हिंसाचार जातीवर आधारित असला तरी सध्या तो नियंत्रणात आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर हिंसाचाराची फक्त एकच घटना घडली असून त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांत एकही मृत्यू झालेला नाही. शांततेचा यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही, असे ते पुढे म्हणाले. यासंबंधीच्या चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे नेते अँटनी यांनी मणिपूरमध्ये केवळ कायदा-सुव्यवस्थाच नाही तर प्रशासनही पूर्णपणे कोलमडल्याचा दावा केला.