जिल्हा बँक अध्यक्ष रमेश कत्तींचा राजीनामा
संचालकांशी अंतर्गत मतभेदातून घेतला पवित्रा : जिल्ह्याचे राजकारण नव्या वळणावर
संकेश्वर : चिकोडीचे माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तीव्र मतभेद सुरू होते. त्याचा शेवट शुक्रवारी अध्यक्ष कत्ती यांच्या राजीनाम्याने झाला. बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांच्या नावे कत्ती यांनी राजीनामा दिला आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून याचे पर्यवसान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पटलावर उमटल्याने रमेश कत्ती यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची वेळ आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकूण 17 संचालक आहेत. या संचालकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. यातच मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने तेव्हा विद्यमान खासदार म्हणून अण्णासाहेब जोल्ले यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत जोल्ले यांना पराभव स्वीकारावा लागला. कत्ती यांनी त्यावेळी अंतर्गत विरोध केल्याचा जोल्ले यांना संशय होता. याचेच पडसाद जिल्हा बँकेत उमटल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली होती. या सभेत नव्या सभासद वाढीवरून अध्यक्ष कत्ती आणि संचालक जोल्ले यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. तेव्हापासून जोल्ले यांनी उघडपणे कत्ती यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती.
दरम्यान गुऊवारी अध्यक्ष कत्ती संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला हजर न राहता अन्यत्र उपाध्यक्ष सुभाष ढवळेश्वर यांच्यासह 14 संचालकांनी बैठक घेतली होती. बँकेचे संचालक व अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी हे बैठकीत गैरहजर असले तरी त्यांनी सदर संचालकांना पाठिंबा दर्शवल्याचे समजते. त्यामुळे 17 पैकी 15 संचालक अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या विरोधात होते. केवळ गजानन क्वळी हेच कत्ती यांच्या बाजूने होते. नाराज संचालकांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठरावाची तयारी केली होती. त्यामुळेच शुक्रवारी दुपारी रमेश कत्ती यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
36 वर्षे संचालक, 22 वर्षे अध्यक्ष
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून रमेश कत्ती यांची सर्वप्रथम 1988 साली निवड झाली होती. यानंतर आजतागायत ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. यादरम्यान 1999 ते 2012 तसेच जुलै 2015 ते ऑक्टोबर 2024 असे एकूण 22 वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. या काळात बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह सरकारच्या कर्जमाफी तसेच बँकेच्या माध्यमातून विविध योजना पुरवत शेतक्रयांना आधार दिला. 2023-24 या आर्थिक वर्षात बँकेला 30 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कालावधी असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने याची जिह्यात चर्चा सुरू झाली आहे.
संपर्काला प्रतिसाद नाही
अचानक घडलेल्या राजीनामा नाट्यातून शुक्रवारी जिह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर पत्रकारांनी रमेश कत्ती यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांच्या नावे राजीनामापत्र दिले आहे. यामध्ये, आपण स्वेच्छेने राजीनामा देत असून हा राजीनामा स्वीकारावा तसेच आपल्याला अध्यक्षपदाच्या काळात संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
नव्या सभासद वाढीवरून वाद
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी, तसेच चिकोडी भागात सभासद वाढवण्याची मागणी केली होती. यावरूनच कत्ती आणि जोल्ले यांच्यामध्ये बैठकीत वाद झाला होता. त्यामुळे जोल्ले यांनी उपाध्यक्षांसह संचालकांची स्वतंत्र बैठक घेऊन कत्ती यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची तयारी चालवली होती. दरम्यान नाराज संचालकांची माजी मंत्री रमेश जारकीहोळी व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी भेट घेतली. यानंतर पुढील घडामोडी, तसेच अविश्वास ठराव येण्याच्या शक्यतेने तत्पूर्वीच कत्ती यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
स्वेच्छेने राजीनामा दिला
शुक्रवारी दुपारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, रमेश कत्ती यांनी कोणत्याही दबावाखाली राजीनामा दिलेला नाही. संचालक मंडळात थोडीशी नाराजी होती. संचालकांनी अध्यक्ष बदलण्याची विनंती केली होती. त्यामुळे एका वर्षाच्या कालावधीसाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळावी व बँकेचा आर्थिक उत्कर्ष व्हावा, या हेतूने कत्ती यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच यापुढेही बँकेचा कारभार चालू राहणार आहे. त्यामुळे याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. कोणाला अध्यक्ष करायचे हे अद्याप निश्चित झाले नसून लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.