धोकादायक विद्युतखांब हलविण्याची पार्वतीनगरवासियांची मागणी
बेळगाव : पार्वतीनगर, कंग्राळी रोड येथे मुख्य रस्त्यावर विद्युतखांब धोकादायक स्थितीत आहे. विद्युतखांब केव्हा कोसळेल, याची शाश्वती नसल्याने जीव मुठीत घेऊन नागरिक ये-जा करीत आहेत. अनेक वेळा तक्रार करून देखील दुरुस्ती केली जात नसल्याने एखादी घटना घडल्यास त्याची जबाबदारी हेस्कॉम कर्मचारी घेणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पार्वतीनगर मुख्य रस्त्यानजीक एक विद्युतखांब आहे. हा विद्युतखांब एका बाजूला कलंडल्याने त्याला आणखी एका विद्युत खांबाचा आधार देण्यात आला आहे. चारही बाजूंनी वीजजोडण्या देण्यात आल्या असल्या तरी विद्युतखांब एका बाजूला कलंडत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे विद्युतखांब केव्हा कोसळेल, हे सांगता येत नाही.
हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
स्थानिक नागरिकांनी याची तक्रार हेस्कॉमकडे केली होती. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हा विद्युतखांब तुम्हीच इतरत्र हलवा, असे उलट उत्तर नागरिकांना देण्यात आले. त्यामुळे हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.