इंद्रप्रस्थनगर येथील समस्या सोडविण्याची रहिवाशांची मागणी
नगरसेवक नितीन जाधव यांनी जाणून घेतल्या समस्या
बेळगाव : पावसाळ्यात विविध प्रभागांमध्ये समस्या निर्माण होत असल्याने अधिकारी आणि नगरसेवक विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 28 मध्ये येणाऱ्या इंद्रप्रस्थनगर येथे नगरसेवक नितीन जाधव यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन समस्या जाणून घेत तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. पावसामुळे शहरातील अनेक प्रभागात गटारी व नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाचे पाणी व सांडपाणी व्यवस्थितरित्या वाहून जावे, यासाठी महापालिकेकडून सफाईचे काम हाती घ्यावे, अशी सूचना स्थानिकातून केली जात आहे. स्वत: महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रभागांना भेटी देऊन समस्या सोडविण्याच्या सूचना करत आहेत. यानंतर आता नगरसेवकांनीदेखील आपापल्या प्रभागांमध्ये फेरफटका मारून नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यास सुरुवात केली आहे. इंद्रप्रस्थनगर हा परिसर प्रभाग क्र. 29 मध्ये येतो. त्यामुळे स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. त्या तातडीने सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.