For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीमगडमधील गावांच्या स्थलांतर विरोधात रहिवासी समितीचा उद्या हेम्माडगा येथे मेळावा

12:08 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
भीमगडमधील गावांच्या स्थलांतर विरोधात रहिवासी समितीचा उद्या हेम्माडगा येथे मेळावा
Advertisement

आमदार शांताराम सिद्धी, आधीवक्ता परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार

Advertisement

खानापूर : भीमगड अभयारण्य तसेच तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना कर्नाटक वन मंत्रालय आणि वनखाते यांच्याकडून पैशाचे आमिष दाखवून स्थलांतर करण्याचा घाट गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने 22 नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन तालुक्यातील नागरिकांनी अरण्य हितरक्षण समिती स्थापन करून स्थलांतराला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी हेम्माडगा येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमदार शांताराम सिद्धी, तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय नेते तसेच राज्य आधीवक्ता परिषदेचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व मठांचे मठाधीश उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन अरण्य हितरक्षण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

स्थलांतरासाठी 15 लाखाचे गाजर

Advertisement

तीन-चार वर्षापासून भीमगड अभयारण्य आणि दुर्गम भागातील गवाळी, पास्टोली, मेंडील, कृष्णापूर, अबनाळी, जामगाव, हेम्माडगा, पाली, देगाव, कोंगळा, केळील, गवळीवाडा, तेरेगाळी, होळदा, नेरसा, शिरोली, शिरोलीवाडा, डोंगरगाव, मांगिनहाळ, हणबरवाडा, आमगाव, चिखले, तळेवाडी, जांबोटीवाडा, सडा, मान, गवसे, विजयनगर, हुळंद, कापोलीवाडा, आंबेवाडी यासह इतर गावांचे टप्पाटप्प्याने स्थलांतरसाठी 15 लाखाचे गाजर दाखवण्यात येत आहे. यामुळे पश्चिम भागातील मानववस्ती नष्ट होणार आहे.

मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य-केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू

या गावातील रहिवासी हे आपल्या वंशपरंपरेने हात आहेत. श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, संगोळ्ळ्ळी रायण्णा यांच्या पादस्पर्शाने पुनित झालेली भूमी मानव वस्तीरहित करण्याचा घाट सरकार आखत आहे. या रहिवाशांना स्वातंत्र्यानंतर 78 वर्षानंतरही त्यांचे हक्क आणि पक्के, रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण अशा सुविधांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. आपल्या माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्यात येणार आहे. या लढ्यातून अरण्य रहिवाशांना त्यांच्याच गावात सुविधा पुरवण्यासाठी या लढ्याच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. तसेच याबाबत केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. जेणेकरून या दुर्गम भागातील गावे स्थलांतर करण्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी, आणि अरण्य रहिवासी हितरक्षण समितीचे संयोजक अॅड. सिद्धार्थ कपिलेश्वरी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

वनविभागातील रहिवाशांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

भीमगड अभयारण्यातील नागरिकांना कायद्याच्या अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा लढा हाती घेतला असून पहिला मेळावा भीमगड अभयारण्यातील हेम्माडगा येथे मंगळवारी सकाळी 11 वा. आयोजित केला आहे. तरी संपूर्ण तालुक्यातील दुर्गम भागातील आणि जंगल वस्तीतील रहिवाशांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन अरण्य हितरक्षण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.