For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना

12:50 PM Aug 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना
Advertisement

दिगंबर कामत यांना पीडब्लूडी तर तवडकर यांना क्रीडा, आदिवासी कल्याण खाते : मंत्रिमंडळ यादीत रमेश तवडकर यांचा शेवटचा तर दिगंबर कामत यांचा शेवटून दुसरा क्रमांक,सर्वाधिक खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच

Advertisement

पणजी : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ पुनर्रचना चर्चेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूर्णविराम देत राज्यातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली. नव्याने दोन मंत्रिपद देण्यात आलेल्यांमध्ये मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम खाते, वजन माप आणि कॅप्टन ऑफ पोर्ट तर काणकोणचे आमदार तथा माजी सभापती तवडकर यांना कला आणि संस्कृती, आदिवासी कल्याण तसेच क्रीडा खात्याचे मंत्रिपद दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचना करताना सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई व मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांच्या खात्यात किरकोळ बदल केला. सुभाष फळदेसाई यांना त्यांच्या खात्यांव्यतिरिक्त पेयजल खाते देण्यात आले आहे. तर अभिलेखागार आणि पुरातत्व विभाग फळदेसाई यांच्याकडून काढून टाकण्यात आला. सुदिन ढवळीकर यांच्याकडील गृहनिर्माण खाते काढून त्याऐवजी संग्रहालय आणि गॅझेट ही दोन खाती देण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खातेबदल करताना फार काळजी घेतल्याचे दिसून आले. कारण मंत्रिमंडळाची पुनर्रचना करताना त्यांनी दोघा अनुभवी राजकारण्यांना मंत्रिमंडळात स्थान देताना आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवूनच आमदार रमेश तवडकर व आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली असली तरी महत्त्वाची खाती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याकडेच ठेवली आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मंत्रिमंडळातील सर्वाधिक खाती  मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडेच आहेत. त्यानंतर क्रमांक दोनचे मंत्री म्हणून विश्वजित राणे यांच्याकडे इतर मंत्र्यांपेक्षा जास्त खाती आहेत.

Advertisement

राज्यातील मंत्रिमंडळ खाते अशी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे महत्त्वाचे गृह, वित्त, दक्षता, कार्मिक, अधिकृत भाषा ही खाती आहेत. तर विश्वजित राणे यांच्याकडे आरोग्य, नगरविकास, नगरनियोजन, महिला आणि बालविकास तसेच वनखाते आहे. दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्याकडे वाहतूक, उद्योग, पंचायत राज, शिष्टाचार. माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्याकडे कृषी, नागरी पुरवठा, हस्तकला. सुभाष शिरोडकर यांच्याकडे जल संपदा, सहकार, प्रोव्हेदोरिया. रोहन खंवटे यांच्याकडे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान मुद्रण आणि लेखनसामग्री. बाबुश मोन्सेरात यांच्याकडे महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन. रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर यांच्याकडे ऊर्जा, नवीन आणि अक्षय ऊर्जा, संग्रहालये, गोवा गॅझेट आणि ऐतिहासिक नोंदी, नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे मत्स्य, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा, कारखाने आणि बॉयलर. सुभाष फळदेसाई यांच्याकडे समाजकल्याण, पेयजल, नदी परिवहन, दिव्यांग सक्षमीकरण. तर नव्यानेच मंत्रिपद दिलेल्यांमध्ये दिगंबर कामत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, वजन माप व कॅप्टन ऑफ पोर्ट. रमेश तवडकर यांच्याकडे आदिवासी कल्याण, कला व संस्कृती व क्रीडा खाते देण्यात आले आहे.

मिळाली मंत्रिपदे; शेवटच्या क्रमांकाची

माजी मुख्यमंत्री असलेले विद्यमान मडगावचे आमदार दिगंबर कामत हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले असले तरी मंत्र्यांच्या यादीत त्यांना शेवटून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. कामत यांना सार्वजनिक बांधकाम खाते दिले असले तरी या खात्याशी संलग्न असलेले पेयजल ह्या खात्याचा कारभार सुभाष फळदेसाई यांच्याकडे राहणार आहे. भाजपचे सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून रमेश तवडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी सभापतीपदावर उत्तम कामगिरी केली. तरीही मंत्र्यांच्या यादीत त्यांना सर्वात खालचे म्हणजे शेवटचे स्थान देण्यात आलेले आहेत.

आणखी एका-दोघाला मंत्रिपद

2027च्या विधानसभा निवडणुकीत नि:संदेह भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. भाजपचे हे यश खऱ्या अर्थाने विकासावर अवलंबून असणार आहे. रमेश तवडकर व दिगंबर कामत हे अनुभवी व ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. या खातेवाटपाबाबत अजूनही पूर्णविराम झालेला नसून, भाजपने सध्या पुढील विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले असल्याने  भविष्यात आणखी एका-दोघाला मंत्रिपद देण्याबाबत विचार केला जाणार आहे.”

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.