Resham Farming Kolhapur: भावांची कमाल! रेशीम शेतीत झाले लखपती, सव्वा एकरात 5 लाखाचं उत्पन्न
गेल्या दीड वर्षापासून त्यांनी शेतीमध्ये तुतूची लागवड केली आहे
By : एम. डी.पाटील
वाशी : करवीर तालुक्यातील जैताळ येथील नंदकुमार रंगराव पाटील आणि रामचंद्र रंगराव पाटील या दोघा भावांनी रेशीम शेतीमध्ये नंदनवन फुलवले आहे. डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या या गावांमध्ये त्यांनी रेशीम उद्योगातून सव्वा एकर जमिनीमध्ये तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
गेल्या दीड वर्षापासून त्यांनी शेतीमध्ये तुतूची लागवड केली आहे. या उद्योगाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या शेतामध्ये रेशीम उद्योगासाठी लागणारे शेड बांधून त्यामध्ये रेशीम अळ्या आणल्या. रेशीम अळीच्या वाढीसाठानंतर वीस ते पंचवीस दिवस लागतात.
त्यासाठी तुतीच्या पानाची आवश्यकता असते. आणि त्यांच्या वाढीसाठी लागणाऱ्या तुतूच्या पानाची पूर्तता केली. त्यांना या उद्योगांमध्ये संगीता पाटील, सुजाता पाटील, प्रसाद पाटील मदत करतात. रेशीम उद्योग वाढीसाठी शासनाकडून एकरी तीन वर्षासाठी चार लाख तीस हजार इतके शासकीय अनुदान मिळते.
अनुदानाचा उपयोग शेड बांधणी, तुती लागवडीसाठी तसेच मजुरांच्यासाठी केला. त्यांनी केलेला प्रकल्प पाहण्यासाठी जिह्यातील लोक भेट देतात. रेशीम उद्योगातून सर्वाधिक उत्पन्न घेणारे शेतकरी म्हणून नंदकुमार पाटील यांचा सत्कार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील यांनी आता साडेचार एकरामध्ये तुतूची लागवड केली आहे. या उद्योगामुळे शेतात मोठ्या बदलाचे संकेत मिळत असून या उद्योगाकडे युवकांनी वळावे, आवाहन नंदकुमार पाटील यांनी केले आहे.