इरफान सोलंकीच्या जामीन अर्जावर निर्णय राखून
महराजगंज तुरुंगात कैद माजी आमदार
वृत्तसंस्था/ प्रयागराज
जाळपोळ प्रकरणी तुरुंगात कैद कानपूरचे माजी सप आमदार इरफान सोलंकी आणि अन्य गुन्हेगारांच्या जामीन अर्जावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश सुरक्षित ठेवला आहे. राज्य सरकारच्या वतीने याप्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायाधीश राजीव गुप्ता आणि सुरेंद्र सिंह यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली आहे.
एमपी-एमएलए विशेष न्यायालयने माजी आमदारासमवेत पाच जणांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे इरफान यांचे विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आले आहे. या शिक्षेच्या विरोधात इरफान यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, तसेच सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर मुक्तता करण्याची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे राज्य सरकारने शिक्षेला जन्मठेपेत बदलण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये इरफान सोलंकी, त्यांचे बंधू रिजवान आणि अन्य 10 आरोपींनी कानपूरच्या रहिवासी असलेल्या नजीर फातिमा यांच्या घराला पेटवून दिले होते. जून महिन्यात याप्रकरणी विशेष न्यायालयाने 5 जणांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती.