Sangli News : आज तासगावमध्ये 12 प्रभागांचे आरक्षण होणार निश्चित : मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे
तासगाव नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष
तासगाव : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तासगांव नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी १२ प्रभाग निहाय बुधवारी आरक्षण सोडत होणार आहे.
या आरक्षण सोडतीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी दिली. तर आरक्षण काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. तासगांव नगरपरिषदेची २०१६ मध्ये यापूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यावेळी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होऊन दि. २८ नोव्हेंबर राजी मतमोजणी होऊन नगरपरिषदेत भाजपचे थेट नगराध्यक्ष व १३ नगरसेवक व राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक निवडून आले होते.
या सर्वाची मुदत दि. २ जानेवारी २०२२ रोजी संपल्यानंतर सर्वांच्या नजरा आगामी निवडणुकीकडे लागून राहिल्या आहेत. नगरपरिषद प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेस अंतिम प्रभाग रचना म्हणून मान्यता मिळाल्यानंतर सर्वांच्या नजरा प्रभाग निहाय आरक्षण कधी याकडे लागून होत्या ही प्रतिक्षा आज बुधवारी संपणार आहे.
नगरपरिषदेच्या साने गुरूजी नाट्यगृहात बुधवार दि. ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ नंतर प्रांताधिकारी तथा अध्यासी अधिकारी उत्तम दिघे, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत चिठठ्या उचलून होणार असून या प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी सांगितले.
जाती, यावेळी अनुसूचित अनुसूचित जाती मधील महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रभागातील महिला अशी सोडत होणार आहे.
शहरात एकूण १२ प्रभाग असून दोन प्रभागातून अनुसूचित जाती पुरूष व अनुसूचित जाती महिला असे आरक्षण असणार आहे.तर या दोन प्रभागापैकी अनुसूचित जाती पुरूष आरक्षण असणाऱ्या प्रभागात सर्वसाधारण स्त्रि आरक्षण असणार आहे.
तसेच अनुसूचित जाती महिला आरक्षण असणाऱ्या प्रभागात एक जागा सर्वसाधारणसाठी असणार आहे. तर उर्वरित १० प्रभागापैकी ६ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी आरक्षित होणार आहेत पैकी ३ प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण निश्चित होणार आहे.
यामध्ये जिथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आहे तेथे दुसरी जागा सर्वसाधारण पुरुष यासाठी आरक्षित होणार आहे. उर्वरित ४ प्रभागात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरूष असे आरक्षण निश्चित होणार आहे.या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.