Kolhapur News : तारीख ठरली ; जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत 'या' तारखेला होणार!
राज्य निवडणूक आयोगाने सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम केला जाहीर
कोल्हापूर : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता १३ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी १० रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.
त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोग सक्रीय झाला आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.