For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्मावर आधारित आरक्षण घटनाबाह्या!

06:58 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
धर्मावर आधारित आरक्षण घटनाबाह्या
Advertisement

मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत ‘आरएसएस’ची भूमिका : प्रतिनिधी सभेच्या तीन दिवशीय बैठकीचा समारोप

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देणे घटनाबाह्या असून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये संघ हस्तक्षेप करणार नाही, असे आरएसएसचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांपासून बेंगळूर शहराबाहेरील चन्नेहळ्ळी येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील निर्णयांची माहिती रविवारी त्यांनी पत्रकारांना दिली. होसबाळे यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकापासून ते औरंगजेब आणि सीमांकनापर्यंतच्या मुद्यांवर निवेदन दिले आहे. बेंगळूरमध्ये आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसांच्या बैठकीचा रविवार शेवटचा दिवस होता.

Advertisement

कर्नाटक सरकारच्या सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी विरोध केला आहे. आपले संविधान धर्मआधारित आरक्षणाला परवानगी देत नाही. तसेच ही कृती घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे, असेही ते म्हणाले.

भाजपाध्यक्ष निवडीत संघाचा हस्तक्षेप नाही

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक केंद्रीय भाजप हाताळणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीशी संघाचा काहीही संबंध नाही. भाजप संघाला विचारून नियुक्ती करत नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. संसदीय मतदारसंघांच्या पुनर्रचनेला दक्षिणेकडील राज्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर बोलताना होसबाळे यांनी, पुनर्रचनेच्या मुद्यावर केंद्राने अधिकृतपणे कोणताही मसुदा प्रकाशित केलेला नाही. या टप्प्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. याप्रकरणी संघ केंद्र सरकारला कोणताही सल्ला देणार नसल्याचेही सांगितले.

आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांनी मुस्लिमांना धार्मिक आरक्षण देण्याचे केलेले प्रयत्न उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. असे आरक्षण देण्याच्या तरतुदी न्यायालयांनी नाकारल्या आहेत. महाराष्ट्र आणि भाजप सरकारमध्ये मंत्र्यांचे पीए म्हणून संघाच्या लोकांना नियुक्त केल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, संघाने कोणालाही पीए म्हणून नियुक्त करण्याची सूचना देत नाही. संघ पार्श्वभूमीचे लोक मंत्रिपदाचे पीए असतील. ते केवळ त्यांच्या प्रतिभा आणि क्षमतेमुळेच असतात. त्यात काहीही चुकीचे नसल्याचे होसबाळे म्हणाले.

औरंगजेबाच्या कबरीबद्दलही केले भाष्य

औरंगजेबाच्या कबरीबद्दल पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, औरंगजेब भारतीय आचार आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. औरंगजेब आयकॉन होऊ शकतो की नाही हे समाजाने ठरवावे, असे त्यांनी सांगितले. या वादाबद्दल विधान करताना आक्रमक विचारसरणी देशासाठी धोका असल्याचेही नमूद केले. समाजात कुठलाही विषय समोर येऊ शकतो. जे लोक गंगा आणि यमुना यांचा आदर करतात अशा लोकांनी औरंगजेबाला त्यांचा आयकॉन बनवले आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आदर्श ठरावयचे की इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान करायचा हा खरा प्रश्न आहे, असे दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात देशभरात छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेत आला. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली आहे. तसंच इतरही हिंदुत्ववादी संघटना यासाठी आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्रात हा विषय ताजा असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनीही या विषयावर भाष्य केले आहे.

शताब्दी वर्षात अनेक जनसंपर्क कार्यक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात अनेक जनसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विजयादशमीदिवशी विविध जनसंपर्क कार्यक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहेत. या जनसंपर्क कार्यक्रमातून समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांमध्ये सामाजिक सहभागाची मागणी करते. सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी तळागाळात मंडल व बस्ती स्तरावर जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही दत्तात्रय होसबाळे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.