झीलँडियाच्या अस्तित्वावर संशोधकांचे शिक्कामोर्तब
समुद्राच्या दोन किलोमीटर खोलवर आहे आठवा खंड
वृत्तसंस्था /वेलिंग्टन
आतापर्यंत आम्ही सात खंडांबद्दल ऐकले होते, परंतु वैज्ञानिकांनी आता एका संशोधनाद्वारे आठव्या खंडाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे. 375 वर्षांनंतर वैज्ञानिकांनी झीलँडियाच्या अस्तित्वाची माहिती दिली आहे. हा खंड 1.89 दशलक्ष चौरस मैलामध्ये फैलावलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. वेगवेगळे खंड हे अनेक देशांना सामावून घेणारे आहेत. परंतु झीलँडिया केवळ 3 तीन क्षेत्रांना व्यापणारे होते. सुमारे 105 दशलक्ष वर्षांपूर्वी झीलँडिया खंड हा गोंडवानाचा हिस्सा होता, ज्यात मागील 500 दशलक्ष वर्षांपासून पश्चिम अंटार्क्टिका आणि पूर्व ऑस्ट्रेलियाचा हिस्सा सामील आहे. झीलँडिया हा खंड गोंडवाना लँडपासून वेगळा झाला आणि समुद्रात सामावला. संशोधक आजही झीलँडिया खंड वेगळा होण्याच्या घटनेसंबंधी संशोधन करत आहेत.
झीलँडिया खंडाचे अस्तित्व पहिल्यांदा 1642 साली समोर आले होते. एक डच व्यापारी आणि खलाशी एबल टॅसमॅन ग्रेट साउथर्न कॉन्टिनेंटच्या शोधात बाहेर पडले होते, त्यादरम्यान त्यांना या खंडासंबंधी कळले होते, परंतु ते न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर पोहोचले होते. तेथे त्यांना स्थानिक रहिवाशांनी परिसरातील जागांबद्दल माहिती दिली होती. तसेच झीलँडियाच्या अस्तित्वाबद्दल त्यांना सांगण्यात आले होते. परंतु याची सत्यता पडताळण्यास सुमारे 400 वर्षांचा कालावधी लागला आहे. 2017 मध्ये भूवैज्ञानिकांनी झीलँडिया खंडाचे अस्तित्व असल्याचे मान्य केले होते. या खंडाचा बहुतांश हिस्सा पाण्यात बुडालेला आहे. 6560 फूट म्हणजे सुमारे 2 किलोमीटर खोल समुद्रात हा खंड सामावला गेल्याचे सांगण्यात येत आहे. झीलँडिया एक असे उदाहरण आहे, ज्याच्या माध्यमातून कुठलेही संशोधन पूर्ण करण्यास किती वेळ लागू शकतो याचा अनुमान लावता येतो. हा खंड गोंडवाना लँडपासून कशाप्रकारे वेगळा झाला होता यावर आता संशोधन केले जात असल्याचे न्यूझीलंड क्राउन रिसर्च इन्स्टीटय़ूटचे भूवैज्ञानिक एंडी यांनी सांगितले आहे.