संशोधन आणि विकास : सर्वसमावेशक प्रगतीचा आधार
3 नोव्हेंबर रोजी भारत मंडपम व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दल जे चिंतन घडविले आहे, त्यामध्ये त्यांनी नवोन्मेष विकास परिषदेच्या मान्यवर तंत्रज्ञांना जे मार्गदर्शन केले ते सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या संबोधनामध्ये त्यांनी भारत आणि पाश्चात्य देशांतील शास्त्रज्ञ नवोन्मेष क्षेत्रांत कार्य करणारे अधिकारी, शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील मान्यवर आणि अभ्यासकांना केलेले मार्गदर्शन हे खरोखरच दिशादर्शक ठरले आहे.
2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली सर्वसमावेशक पायाभूत विकासाची पुनर्रचना अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी त्यांनी संशोधन व विकास यावर भर देण्याचे सुनिश्चित केले आहे. अमेरिका, रशिया, चीन यासारख्या विकसित देशांच्या प्रगतीचा खरा आधार संशोधन आणि विकास हा आहे. त्यामुळे नवभारताची उभारणी करताना आपणास संशोधन आणि विकासाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी ‘जय जवान, जय किसान’, जय विज्ञान’ या घोषणेस “जय अनुसंधान” अशी यथार्थ जोड दिली आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भारत नवोन्मेष परिषद-2025 मध्ये केलेले अभिभाषण अनेक दृष्टीने क्रांतिकारक आणि दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या चिंतनाचा संदेश प्रस्तुत लेखामध्ये मांडला आहे.
संशोधन ही गुरुकिल्ली
आधुनिक जगामध्ये गतीने पुढे जावयाचे असेल तर संशोधन आणि विकास हीच सर्वांगीण सर्वसमावेशक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे ओळखून पंतप्रधानांनी संशोधन आणि विकासासाठी विपुल भांडवली निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा विज्ञान मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचते, जेव्हा नवोन्मेष सर्वसमावेशक बनतो, तेव्हा तंत्रज्ञान समग्र परिवर्तन घडवू शकते. तेव्हाच कुठल्याही राष्ट्राच्या महान कामगिरीचा भक्कम पाया घातला जाऊ शकतो. तसेच भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक नव्हे, तर परिवर्तनाचा प्रणेता बनला आहे. वर्तमान काळात भारत जगामध्ये नैतिक आणि मानव केंद्रित कृत्रिम प्रज्ञेच्या विकासासाठी एक नवी जागतिक चौकट विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणात अधोरेखित केले आहे.
चिंतन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे
3 नोव्हेंबर रोजी भारत मंडपम व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दल जे चिंतन घडविले आहे, त्यामध्ये त्यांनी नवोन्मेष विकास परिषदेच्या मान्यवर तंत्रज्ञांना जे मार्गदर्शन केले ते सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या संबोधनामध्ये त्यांनी भारत आणि पाश्चात्य देशांतील शास्त्रज्ञ नवोन्मेष क्षेत्रांमध्ये कार्य करणारे अधिकारी, शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील मान्यवर आणि अभ्यासकांना केलेले मार्गदर्शन हे खरोखरच दिशादर्शक ठरले आहे. महिला क्रिकेट संघाच्या विश्व विजेत्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करून ही यशोगाथा प्रेरणेचा नवा अध्याय आहे, हे त्यांनी नमूद केले. भारतीय शास्त्रज्ञांनी जगामध्ये अग्रभागी राहून सर्व क्षेत्रांवर दैदिप्यमान कामगिरीचा ठसा उमटविला पाहिजे, असा संदेश त्यांनी या परिषदेत दिला आहे. जगातील सर्वात सुप्रतिष्ठित आणि वजनदार अशा संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी उ•ाण केल्याबद्दल त्यांनी इस्रोचे अभिनंदन केले आणि आपल्या रास्त अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी असे सूत्र मांडले की, 21 व्या शतकात जगातील तज्ञांनी एकत्र येऊन नवोन्मेषाच्या विकासासाठी विचारमंथन घडविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे मानवी कल्याणाच्या नव्या दिशा अधिक गतीने उजळू शकतील.
सर्वांच्या विचार मंथनातून एक नवी दृष्टी विकसित होत आहे आणि ही दृष्टी जगाला नव्या अशा-आकांक्षा पल्लवीत करण्यासाठी प्रेरक ठरेल. या परिषदेत नोबेल पुरस्कार विजेतेसुद्धा उपस्थित आहेत, याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
परिवर्तनाचा संक्रमण काळ
21 वे शतक हा अभूतपूर्व परिवर्तनाचा संक्रमण काळ आहे, हे लक्षात घेऊन आपण नव्या दिशेने वाटचाल करावी असा आग्रह त्यांनी धरला. जागतिक व्यवस्था एका नव्या दिशेने परिवर्तनाकडे झेपावत आहे. अशावेळी आपण मागे राहून चालणार नाही. या परिवर्तनाची गती केवळ एकरेषीय नाही, तर ती घातांकात प्रकट होते. म्हणजेच या बदलाचा वेग प्रचंड आहे. या दृष्टीने भारत प्रगत तंत्रज्ञानावर प्रामुख्याने विशेष लक्ष केंद्रित करत आहे. भारतीय विद्यापीठांतून संशोधनाला गती देण्यासाठी भारतीय संशोधन प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे आणि त्यास भक्कम बैठक प्रदान करून दिली जात आहे. संशोधन, विकास आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत स्वातंत्र्योत्तर काळात एवढा मोठा निधी संशोधनासाठी कधीही उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. उच्च जोखीम आणि उच्च प्रभावासाठी पहिल्यांदाच एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तो सत्कारणी लागावा आणि त्या आधारे देशाची संशोधन क्षेत्रात एक नवी गरुडझेप घ्यावी, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संक्रमण आणि परिवर्तन काळात भारताने मागे राहू नये म्हणून भारतीय शास्त्रज्ञांना आकाशात उंच झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखांना नवे बळ देण्याचा पंतप्रधानांनी प्रयत्न केला आहे.
नवोन्मेष परिसंस्थेचा विकास
भारतीय विद्यापीठे तसेच प्रगत भारतीय प्रयोग ही संस्था यांनी एकत्र येऊन भारतामध्ये नवोन्मेष परिसंस्थेचा विकास करावा, अशी त्यामागे अपेक्षा आहे. विशेषत: आधुनिक क्षेत्रात नवोन्मेष परिसंस्था विकसित करण्यासाठी भारत कसोशीने प्रयत्न करत आहे व आता भविष्यकाळात संशोधनाची सोय व संधी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
(पूर्वार्ध)
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर