‘असतील तेथेच सुटका करा’
उच्च न्यायालयाचा सी. टी. रवी यांना दिलासा : अपशब्द प्रकरणात पोलिसांकडून रात्रभर भटकंती : भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त
बेळगाव, बेंगळूर : माजी मंत्री व विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांच्या अटकेनंतर बेळगावात मोठा हायड्रामा घडला आहे. गुरुवारी रात्रभर पोलिसांनी त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात फिरवून शुक्रवारी सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्यांना जामीन मिळवण्यासाठी बेळगाव येथील न्यायालयाबरोबरच बेंगळूरमध्येही जामीन अर्ज दाखल करण्यात आले होते. शेवटी उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सुवर्णविधानसौधमध्ये गुरुवार दि. 19 डिसेंबर रोजी दुपारी सी. टी. रवी यांना अटक केल्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी त्यांना खानापूरला नेले. खानापूर पोलीस स्थानकात मध्यरात्रीपर्यंत ठेवून बेंगळूरला नेण्याचे सांगून कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षात त्यांना बेंगळूरला न नेता बेळगाव, बागलकोट, धारवाड जिल्ह्यातील विविध भागात फिरवण्यात आले. शुक्रवारी पहाटे तर सी. टी. रवी यांनी पोलिसांचे वाहन थांबवून भररस्त्यात रास्तारोको केला.
रवी यांना कारमध्ये कोंबून पहाटे 4 वाजता बागलकोटकडे नेण्यात आले. लोकापूरजवळ वाहन थांबवून थोडा वेळ काढण्यात आला. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास यादवाड पुलावर कार थांबवून पोलिसांनी आपापसात चर्चा केली. या दरम्यान प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही अटकाव करण्यात आला. पहाटे 4.45 वाजता हुलकुंदजवळ वाहन थांबविण्यात आले. पंधरा मिनिटे आपापसात चर्चा केल्यानंतर सकाळी 6 वाजता बटकुर्कीकडे वाहने नेण्यात आली. तेथे वाहने थांबवून पुन्हा अधिकाऱ्यांनी चर्चा केली. सकाळी 6.40 वाजता यरगट्टीला येऊन तेथून गोकाक तालुक्यातील अंकलगी पोलीस स्थानकाला आणण्यात आले.
सकाळी मुचंडीमार्गे मुतग्याला येऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात रवी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सकाळी 10 वाजता त्यांना न्यायालयात आणण्यात आले. अकरा वाजण्याच्या सुमारास तेथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाचव्या न्यायालयासमोर सी. टी. रवी यांना हजर करण्यात आले. अॅड. एम. बी. जिरली, अॅड. रविराज पाटील आदींनी रवी यांना जामीन मिळण्यासाठी न्यायालयात युक्तिवाद केला. सी. टी. रवी यांनी बेळगाव पोलिसांनी रात्रभर आपल्याला कोठे कोठे फिरवले, याची माहिती न्यायाधीशांसमोर दिली.
हिरेबागेवाडी पोलिसांनी हे प्रकरण बेंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनातून त्यांना बेंगळूरला नेण्यात आले. याच दरम्यान एफआयआर रद्द करावा, या मागणीसाठी सी. टी. रवी यांच्या वकिलांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रवी यांना घेऊन बेंगळूरला जाणारी वाहने हावेरीला पोहोचलेली असतानाच उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेले अपशब्द, आरडाओरड, हल्ल्याचे प्रयत्न, अटक आदी प्रकरणांमुळे बेळगावात मोठ्या वेगवान घडामोडी घडल्या.
मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार
सी. टी. रवी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाबाहेर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मंत्री प्रभू चव्हाण, माजी मंत्री सुनीलकुमार यांच्यासह भाजप नेत्यांची फौजच न्यायालय आवारात हजर होती. रवी यांच्याबरोबर पोलीस अमानुषपणे वागले आहेत. यासंबंधी आपण मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार असल्याचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सांगितले. हावेरी येथील सरकारी विश्रामधामावर पोलीस व सी. टी. रवी यांनी जेवण घेतले. हावेरीहून दावणगेरीकडे जाताना उच्च न्यायालयाचा निकाल लागला. रवी यांची आहेत तेथेच सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.
रात्रभर मानसिक-शारीरिकरीत्या त्रास
सी. टी. रवी यांना बेंगळूरला नेताना पोलीस वाहनाच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते आर. अशोक व प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र असलेल्या वाहनातून त्यांचा पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी गुरुवारी रात्रभर त्यांना मानसिक व शारीरिकरीत्या त्रास देण्यासाठी तीन जिल्ह्यात फिरवले आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून पोलीस वाहनापाठोपाठ आम्हीही पाठलाग करीत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
सत्याचा विजय
उच्च न्यायालयाने आपल्याला जामीन मंजूर केला आहे, हा सत्याचा विजय आहे. काँग्रेस सरकारने पोलिसांचा वापर करून माझ्यावर शारीरिक हल्ले केले आहेत. कायद्याचे पालन करणाऱ्या पोलिसांनी आपल्यावर हल्ला केला आहे. गुरुवारी जे दु:ख मी अनुभवले ते मी 35 वर्षांपूर्वी अनुभवले होते. हे सर्व काही नवीन नाही. अशा कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो.
-सी. टी. रवी, विधानपरिषद सदस्य
सी. टी. रवींची दावणगेरे येथून सुटका
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेले विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. त्यामुळे सी. टी. रवी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यांची दावणगेरे येथून सुटका करण्यात आली आहे. सी. टी. रवी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती एम. जी. उमा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रवी कोठे असतील तेथूनच त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बेंगळूर लोकप्रतिनिधी न्यायालयातही या प्रकरणावर सुनावणी झाली. सी. टी. रवी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अशोक हारणहळ्ळी यांनी, अटक करण्याबाबत पक्षकार किंवा कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच तक्रारदार मंत्री असल्याने त्यांना धमकावणे शक्मय आहे का?, असा प्रश्न करीत तक्रारदाराच्या समर्थकांनी आपल्या पक्षकारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील एम. एस. श्यामसुंदर म्हणाले, आरोपीने असंवैधानिक शब्द वापरले असून तक्रारकर्त्यांना अनेकदा त्याच शब्दाने हाक दिली आहे. एका आमदाराने एका महिलेला अशाप्रकारे बोलावले आहे,’ असे म्हणत सीता सोरेन प्रकरणाचा उल्लेख करून युक्तिवाद केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर लोकप्रतिनिधी न्यायालयाने अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी शनिवारपर्यंत पुढे ढकलली.