खासगी वाहन उलटून शिक्षकांसह 34 विद्यार्थी जखमी
होन्नावर तालुक्यातील अरोळ्ळी अवघड वळणावरील दुर्घटना
कारवार : खासगी वाहन उलटून शिक्षकांसह 34 विद्यार्थी जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी रात्री होन्नावर तालुक्यातील मुरवा ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील अरोळ्ळी येथे अवघड वळणावर घडली. 34 पैकी चार विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मणिपाल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर विद्यार्थी आणि शिक्षक किरकोळरीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी होन्नावर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी, कोलार जिल्ह्यातील मुळूरू तालुक्यातील मास्तीहळ्ळी येथील कर्नाटक माध्यमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षकांसह दोन खासगी वाहनातून सहलीसाठी पुराणप्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्ण येथे दाखल झाले होते. सहलीचा आनंद लुटून परतीच्या मार्गावर असताना 40 विद्यार्थी प्रवास करीत असलेल्या वाहनचालकाचा होन्नावर तालुक्यातील मुगवा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील अरोळ्ळी येथील एका अवघड वळणावर वाहनावरील ताबा सुटला आणि ते वाहन पलटी झाले. त्या वाहनातील शिक्षकांसह एकूण 34 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवारी रात्री 12 वा. घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच होन्नावर पोलिसांनी आणि स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन किरकोळरित्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी होन्नावर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. गंभीररित्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मणिपालला हलविण्यात आले आहे. होन्नावर पोलिस अधिक तपास करीत आहेत.