रा. स्व. संघाच्या समन्वय बैठकीस प्रारंभ
तीन दिवसांचे अधिवेशन, समाजकार्याचा घेतला आढावा, भाजपचे नेतेही उपस्थित
वृत्तसंस्था / पलक्कड (केरळ)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय समन्वय अधिवेशनाला केरळ राज्यातील पलक्कड येथे प्रारंभ झाला आहे. या अधिवेशनाच्या प्रथमदिनी शनिवारी संघाचे समाजकार्य आणि शाखांची कामगिरी यांचा आढावा घेण्यात आला. या अधिवेशनाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित आहेत. हे अधिवेशन तीन दिवस चालणार असून महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील परस्पर सहकार्य आणि संबंधांवरही विचार केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत, महासचिव दत्तात्रेय होसबाळे, तसेच सहमहासचिव कृष्ण गोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, राम दत्त चक्रधर, अतुल लिमये आणि अलोक कुमार हे संघाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश न•ा, बी. एल. संतोष, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताकुमारी तसेच महासचिव सीता अन्नदानम, वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे अध्यक्ष सत्येंद्रसिंग, अखिल भारतीय माजी सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष व्ही. के. चतुर्वेदी, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोक कुमार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष नारायणभाई शहा, अखिल भारतीय परिषदेचे संघटन सचिव अशीश चौहान, विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण राव, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पांड्या आणि आरोग्य भारती संस्थेचे अध्यक्ष राकेश पंडित यांचीही उपस्थिती आहे.
32 संघटनांचे प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रणित 32 समाजसेवी संस्थांचे प्रमुख पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित आहेत. हे अधिवेशन पलक्कडच्या अहलिया संकुलात होत असून ती सोमवारपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या प्रथम दिनी शनिवारी संघ आणि त्याच्या विविध संस्था यांच्या राष्ट्रीय स्तरावरील समाजकार्याचा आढावा घेण्यात आला. केरळमधील वायनाड येथे नुकताच पुरामुळे हाहाकार उडाला होता. या नैसर्गिक आपत्तीत संघाच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात साहाय्य केले होते. या कार्याचाही आढावा शनिवारी घेण्यात आला.
सद्य:स्थितीवर चर्चा होणार
या तीन दिवसांच्या अधिवेशनात राष्ट्रीय स्तरावरील सध्याची परिस्थिती, राष्ट्रीय पातळीवर अलिकडच्या काळात घडलेल्या घटना, सामाजिक परिवर्तन, संघ आणि संघप्रणित संस्थांनी चालविलेल्या समाज हिताच्या योजना, आदींवर विचार केला जाणार आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघप्रणित संस्था यांच्यामधील समन्वय असा अधिक सुदृढ करता येईल, यासंबंधीही विचारविमर्श केला जाणार आहे. संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील सहकार्यावर विशेष लक्ष दिले जाईल, अशी माहिती संघाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संघशताब्दीचा महोत्सव लवकरच
पुढचे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचे वर्ष आहे. ते राष्ट्रव्यापी पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषाही या अधिवेशनात निर्धारित केली जाणार आहे. 1925 या वर्षात विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे वर्ष 2025 च्या विजयादशमीदिनापासून या संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ केला जाणार आहे. हा महोत्सव वर्ष 2026 च्या विजयादशमीपर्यंत साजरा केला जाणार आहे. हे शताब्दी वर्ष सामाजिक परिवर्तन वर्ष म्हणून मानण्यात येणार असून यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंचसूत्री कार्यक्रम आयोजित केला आहे. ही पंचसूत्री ‘पंचपरिवर्तन’ या संज्ञेने परिचित केली जाणार आहे, अशी माहिती आहे.
बॉक्स
सहस्रावधी शाखा
आजमितीस भारतभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 73 सहस्रांहून अधिक शाखा चालतात. स्वयंसेवकांची संख्या 75 लक्षांहून अधिक आहे. संघाच्या विविध संस्थांच्या कार्याशी जोडले गेलेल्यांची संख्या अगणित आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि विविध समाजघटकांध्ये संघकार्याचे वैशिष्ट्यापूर्ण स्थान आता निर्माण झाले आहे. समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेतही संघाचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनिल अंबेकर यांनी दिली आहे.
संघशताब्दीसाठी संस्था सज्ज
ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचा महोत्सव देशव्यापी पद्धतीने होणार
ड समन्वय अधिवेशनात संघाच्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती
ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष संबंधांवरही विचारविमर्श
ड तीन दिवसांच्या अधिवेशनात समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेवरही चर्चा होणार