अबुधाबीतील मंदिरात पोहोचले अनेक देशांचे प्रतिनिधी
ही तीर्थभूमी असल्याचे नेपाळच्या राजदूतांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ अबुधाबी
संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी अबुधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी तेथे जगभरातील अनेक मुत्सद्यांचे स्वागत केले आहे. सर्व मुत्सद्दी मंदिराची वास्तुकला, नक्षीकाम आणि एकतेचे संदेश पाहून आनंदी झाले. बीएपीएस मंदिराच्या उद्घाटनाला आता फारच कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील मुत्सद्यांचा मंदिर दौरा पार पडल्याचे युएईतील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी 42 देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण दिले होते. यात अर्जेंटीना, आर्मेनिया, बहारिन, बांगलादेश, बोस्निया, हर्जेगोविना, कॅनडा, चाड, चिली, चेक प्रजासत्ताक, सायप्रस, डॉमिनिकन प्रजासत्ताक, इजिप्त, युरोपीय महासंघ, फिजी, गाम्बिया, जर्मनी, घाना, आयर्लंड, इस्रायल, इटली, मोल्दोवा, मोंटेनेग्रो, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, नायजेरिया, पनामा, फिलिपाईन्स, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका, स्वीडन, सीरिया, थायलंड, युएई, ब्रिटन, अमेरिका, झिम्बाम्बेचे प्रतिनिधी सामील होते.
सुमारे 60 अतिथींचे हार घालून स्वागत करण्यात आले. याचबरोबर त्यांच्या उपस्थितीचे महत्त्व दर्शवत त्यांना पवित्र धागा देखील बांधण्यात आला आहे. हे मंदिर जणू अशक्य वाटत होते, परंतु स्वप्न पूर्ण झाल्याचे उद्गार यावेळी भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी काढले आहेत.
फेब्रुवारीत होणार उद्घाटन
बीएपीएस हिंदू मंदिर प्रकल्पाचे प्रमुख स्वामी ब्रह्मविहारीदास यांनी भारत आणि युएईचे आभार मानले आहेत. युएईतील नेपाळचे राजदूत तेजबहादुर छेत्री यांनी मंदिराला तीर्थभूमी ठरविले आहे. ही एक प्रेरणादायी वास्तू असून ती आम्हाला प्रेम, सद्भावना आणि सहिष्णुतेची शिकवण देते. हे मंदिर आम्ही आमच्या पुढील पिढ्यांना भेट म्हणून देऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
युएईत हे मंदिर म्हणजे आतापर्यंतचा माझा सर्वात चांगला अनुभव आहे. या मंदिराच्या निर्मितीची प्रक्रिया मी अनुभवलो आहे. हे सद्भावनेचे उदाहरण आहे. भारत आणि युएईचे मी आभार मानतो असे थायलंडचे राजदूत सोरायुत चसोम्बत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महंत स्वामी महाराज हे 14 फेब्रुवारी रेजी या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.