मका, मुगाला आधारभूत दर निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांना निवेदन
बेंगळूर : राज्यात मका आणि मुगाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे या पिकांना योग्य आधारभूत दर जाहीर करा, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावतीने आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. उडुपी श्रीकृष्ण मठातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीहून मंगळूर विमानतळावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्वागत केले तसेच याबाबत निवेदन सादर केले.
सोशल मीडियावर याबद्दल माहिती देताना, मंत्री दिनेश गुंडूराव यांनी, मका, मुगाचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आहेत. पिकांना योग्य आधारभूत दर नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्या आहे. आधारभूत दर जाहीर करून पिकांच्या खरेदीची व्यवस्था करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सदर निवेदन पंतप्रधानांना दिले आहे, असे म्हटले आहे.
केंद्राने तत्काळ हस्तक्षेप करावा
दर घसरल्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून आधारभूत दर जाहीर करावा. तसेच मका आणि मुगाची खरेदी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या निवेदनात केली आहे. कर्नाटकने रेशन वितरण व्यवस्थेत मक्मयाचा समावेश केलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी किंमत स्थिरता राखणे शक्मय झालेले नाही. त्यामुळे एफसीआय, नाफेड आणि इतर खरेदी एजन्सींना आधारभूत दराने मका आणि मुगाची खरेदी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.