ई-खातासाठी ऑटोनगरमधील उद्योजकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शहरातील कणबर्गी औद्योगिक क्षेत्रातील ऑटोनगरमध्ये सुमारे 1200 औद्योगिक कारखाने आहेत. येथील उद्योजकांना आपला उद्योग वाढविण्यासाठी किंवा नवीन सुरू करण्यासाठी बँकांद्वारे कर्ज सुविधांची आवश्यकता असते. बँकांकडून ई-खाताचा तगादा लावण्यात येत आहे. यासाठी महापालिकेला ऑटोनगरमधील उद्योजकांना ई-खाता लवकरात लवकर देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कणबर्गी इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ऑटोनगरमध्ये बरेच व्यावसायिक लहान-मोठे उद्योग सुरू करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यासाठी बँकांकडून कर्ज स्वरुपात मदत घ्यावी लागते. मात्र बँकेकडून कर्जासाठी ई-खाता देण्याची सक्ती केली आहे. मात्र हा भाग आपल्या आखत्यारित येत नसल्याने आम्ही ई-खाता देऊ शकत नसल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. धारवाड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना तेथील महापालिकेकडून ई-प्रदान करण्यात येत आहे. तसेच ई-खातासाठी अनेक बैठका झाल्या असून या बैठकीत ऑटोनगरमधील उद्योजकांना सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ई-खाते जारी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.