पंचमसाली लाठीहल्ल्याचा अहवाल गृहमंत्र्यांकडे सुपूर्द
10 डिसेंबर रोजी काळ्या फिती बांधून निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन छेडणाऱ्या पंचमसाली समाजबांधवांवर 10 डिसेंबर 2024 रोजी लाठीहल्ला केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या आयोगाने चौकशी पूर्ण केली असून गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना चौकशी अहवाल सुपूर्द केला आहे.
10 डिसेंबर हा दिवस लिंगायतांवरील अत्याचार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. कुडलसंगम येथील जगद्गुरु बसव जयमृत्युंजय स्वामी यांनी ही माहिती दिली आहे. 2ए मध्ये पंचमसाली समाजाचा समावेश करावा, या मागणीसाठी आम्ही आंदोलन छेडले होते. आम्हाला या सरकारने आरक्षण तर दिले नाही उलट आमच्यावर लाठीहल्ला केला.
लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ 10 डिसेंबर रोजी काळ्या फिती बांधून मौन निदर्शने करण्यात येणार आहेत. आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून समाजाचे आंदोलन सुरू आहे. तीन-चारवेळा मुख्यमंत्र्यांना अर्ज-विनंत्या केल्या पण समाजाची मागणी घटनाबाह्या असल्याचे सांगत त्यांनी ती फेटाळली, असेही स्वामीजींनी सांगितले.
लाठीहल्ला चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश बन्नीकट्टी हणमंतप्पा आर. यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला होता. सुवर्ण विधानसौधमध्ये या आयोगाने संबंधितांची चौकशी करून जबानी नोंदविली आहे. 10 जुलै 2025 रोजी एक सदस्यीय आयोग अस्तित्वात आला. 18 ऑगस्टपासून आयोगाने चौकशी करून 15 ऑक्टोबरला चौकशी पूर्ण केली होती. मंगळवारी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना चौकशी अहवाल सुपूर्द केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळात किंवा विधिमंडळात मांडून सरकार पुढील निर्णय घेणार आहे. अहवाल सादर करताना मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार आमदार पोन्नण्णा हेही उपस्थित होते. यंदा अधिवेशनात पंचमसाली समाज पुन्हा आक्रमक होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.