संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित कळवा : ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
बेळगाव : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर सर्वत्र सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीसह दोन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असल्यामुळे अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ याची माहिती लष्कर, कॅन्टोन्मेंट, तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना द्यावी, अशी सूचना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केली. गुरुवारी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीनंतर त्यांनी नागरिकांना सूचना केल्या. सध्या सोशल मीडिया व सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कोणताही नवा चेहरा कॅन्टोन्मेंट परिसरात निदर्शनास आल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी. चिंता करण्याची कोणतीही गरज नसली तरी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्हीद्वारे सर्वत्र नजर
कॅन्टोन्मेंट परिसरात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्येच लष्कराचा भाग येत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. अवजड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचा इशारा ब्रिगेडियर मुखर्जी यांनी दिला.