उशिरा का होईना पण रेल्वे प्रशासनाला जाग
तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
प्रतिनिधी/ बेळगाव
तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलावर खड्डयांबाबत चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली. शनिवारी रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर विभागाकडून उड्डाणपुलावरील खड्डयांची डागडुजी करण्याच्या कामाला सुरुवात झाली. खड्डयांमध्ये खडी भरून अतिरिक्त असलेली खडी बाजूला काढण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. यामुळे दिवसभर उड्डणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. उड्डाणपुलाचे काम होऊन दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता उखडून गेला. ठिकठिकाणी रस्ता खचला असून भलेमोठे खड्ड पडले आहेत. उड्डाणपुलाच्या मध्यातील काँक्रिटवरील डांबरीकरण पूर्णपणे निघून गेले आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मागील 15 दिवसांत झालेल्या पावसामुळे उड्डाणपुलाच्या कामाची खरी गुणवत्ता समोर आली. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डायांमुळे अनेक वाहनचालकांचे अपघात झाले. यामुळे उद्यमबाग येथील उद्योजकांनीही आपली नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला दुरुस्तीचे आदेश दिले होते. शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांनीही उड्डाणपुलाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यामुळे शनिवारी सकाळपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. भारतीय रेल्वेच्या रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाकडून या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्यांच्याकडूनच देखरेख केली जात आहे. अद्याप या विभागाने हा उड्डाणपूल नैर्त्रुत्य रेल्वेकडे देखरेखीसाठी दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाने शनिवारी उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवून कामाला सुरुवात केली. खड्डायांमध्ये खडी भरणे, तसेच डांबरीकरणाची जमा झालेली खडी काढणे असे काम करण्यात आले.
दुसरे रेल्वेगेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी
शनिवारी दिवसभर तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल बंद असल्यामुळे पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात वाहनांची संख्या वाढली होती. यामुळे दुसरे रेल्वेगेट येथे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. विशेषत: सकाळी शाळांच्या वेळेत व सायंकाळी कारखाने सुटल्यानंतर टिळकवाडी परिसरात मोठी गर्दी झाली होती