चौगुले-पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार व्हावा
मागणी वाढल्याने गुऱ्हाळे पुन्हा सुरू : आमदार विठ्ठल हलगेकर
खानापूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी चौगुले-पाटील यांनी गुऱ्हाळ सुरू करून नवीन पायंडा पाडला आहे. तालुक्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळे होती. मात्र अलीकडे साखर कारखान्यामुळे गुऱ्हाळे कालबाह्य झाली होती. मात्र आता गुळाला पुन्हा मागणी वाढल्याने गुऱ्हाळे सुरू होत आहेत. चौगुले-पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम या माध्यमातून राबवावेत व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चौगुले-पाटील यांच्या गुऱ्हाळ उद्घाटनप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब दळवी होते. प्रारंभी स्मितल दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सई पाटील यांनी प्रास्ताविक करून गुऱ्हाळ सुरू करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. यानंतर मान्यवर्डां दीपप्रज्वलन केले.
व्यासपीठावर श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, पीएलडी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण, बाळाराम शेलार, गोपाळ पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाईसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रमाकांत कोंडुसकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून चौगुले आणि पाटील यांनी गुऱ्हाळात नवीन संशोधन करावे, शेतकऱ्यांना प्रयोगशील व आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे. तसेच शेतकऱ्यांना उसाचा जास्तीत मोबदला देवून आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे ईश्वर घाडी, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, प्रकाश चव्हाण यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.