अलारवाड अंडरब्रिज सर्कलपर्यंतचा रस्ता दुरुस्त करा
बेळगाव : जुने बेळगाव ते जुन्या पी. बी. रोडवरील अलारवाड अंडरब्रिज सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसामुळे या मार्गाची दुर्दशा झाली असून वाहतुकीसाठी समस्या येत आहेत. तसेच हा रस्ता खड्ड्यांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून, परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जनतेच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून रस्ता नूतनीकरण करण्याची मागणी वकिलांतर्फे केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या मार्गावरून हलगा, बस्तवाड, अलारवाड येथील नागरिक व वकील शहराकडे येत असतात. या भागातील शेतकरी आपल्या शेतीमालासह बाजारपेठेत येत येतात. तर आपल्या विविध कामांसाठी नागरिकांची वारंवार शहराकडे ये-जा असते. तसेच मोठ्या प्रमाणात वकीलही आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येतात. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र या पावसाळ्यात या रस्त्याची वाताहात झाली असून या मार्गावरून प्रवास करणे कठीण बनले आहे.
अलारवाड अंडरब्रिज सर्कलपर्यंतच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर खोल खड्डे पडल्याने सर्वसामान्यांना ये-जा करणे मुश्कील बनत आहे. काही वेळा किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने लवकरात लवकर रस्त्याची दुरुती करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी अॅड. आण्णासाहेब घोरपडे, अॅड. मारुती कामाण्णाचे, अॅड. एम. के. कांबळे, सदानंद बिळगोजी, सागर कामाण्णाचे यांच्यासह वकील, रहिवासी उपस्थित होते.