For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गाची त्वरित दुरुस्ती करा

12:13 PM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वेंगुर्ला राज्य महामार्गाची त्वरित दुरुस्ती करा
Advertisement

अन्यथा आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला या राज्य महामार्गाची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सात ग्राम पंचायतींनी एकत्रपणे दिला आहे. यासंदर्भात उचगाव, बेकिनकेरे, तुरमुरी, सुळगा, कुद्रेमनी, आंबेवाडी व हिंडलगा गावच्या ग्राम पंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याचा काही भाग हा रायचूर-बाची व्हाया बेळगाव आहे. अंदाजे 15 ते 16 किलोमीटर लांब या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यापूर्वी झाली नव्हती इतकी चाळण या रस्त्याची झालेली आहे. हाच रस्ता पुढे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या महाराष्ट्रातील जिल्ह्यांपर्यंत जातो व पुढे गोव्याला संलग्न होतो.

या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने, ट्रक्स, दुचाकी, सायकलस्वार व पादचारी ये-जा करत असतात. याशिवाय बेळगाव महानगरपालिका व कॅन्टोन्मेंटचे दीडशे ते दोनशे ट्रक कचरा उचल करून घेऊन तुरमुरी कचरा डेपोमध्ये आणून टाकतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सर्वच वाहनचालकांची व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. किंबहुना त्यांचा जीव धोक्यात आला आहे. हा रस्ता नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी अशा सर्वांनाच उपयोगी असून बेळगाव तालुक्यातील 35 ते 40 गावांतील लोक या रस्त्यावरून ये-जा करतात, असेही निवेदनात म्हटले आहे. वारंवार सांगून व निवेदन देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सात ग्राम पंचायत एकत्र येऊन आंदोलन करू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.