करंबळ-बेकवाड यात्रोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक
रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करण्याची ग्रामस्थांची मागणी : नंदगड-बिडी रस्ता होणे अत्यावश्यक : मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने वाहतुकीची समस्या
खानापूर : तालुक्यातील करंबळ आणि बेकवाड येथील महालक्ष्मी देवीची यात्रा फेब्रुवारी महिन्यात 28 तारखेला भरविण्यात येणार आहे. या यात्रेला तालुक्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथून भक्त मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येणार आहेत. यामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र बेकवाड आणि करंबळ गावांना जोडणारे संपर्क रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले असून हे रस्ते करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. करंबळसह पाच गावची यात्रा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही यात्रा करंबळ, होनकल, जळगा, रुमेवाडी आणि कौंदल या गावांची असून यात्राकाळात महालक्ष्मी देवीची मूर्ती करंबळ येथील गदगेवर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनाला करंबळ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
करंबळ-जळगे-चापगाव रस्ता दुरुस्तीची मागणी
करंबळ-जळगा-चापगाव या 7 किलोमीटर रस्त्याच्या नव्याने निर्मितीसाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत 6 कोटी 72 लाख ऊपये निधी मंजूर करण्यात आला होता. करंबळ ते चापगाव व्हाया जळगा रस्ता गेल्या तीन वर्षापूर्वी करण्यात आला होता. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर जागोजागी ख•s पडले असून काही ठिकाणी रस्त्यावरची खडीच उखडून गेल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत रस्ता तयार केल्यानंतर रस्त्याची पुढील पाच वर्षे कंत्राटदाराने देखभाल करणे गरजेचे आहे. मात्र हा रस्ताच निकृष्ट बनल्याने रस्त्यावर ख•s पडले असून काही ठिकाणी खडी उखडून गेली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याबाबत कंत्राटदाराला कोणतीच सूचना केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी करंबळ, जळगा, चापगाव रस्त्याची पाहणी करून कंत्राटदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात यावी, अशी मागणी करंबळ, जळगा, चापगाव ग्रामस्थांतून होत आहे.
चापगाव-यडोगा रस्ताही उद्ध्वस्त
चापगाव-यडोगा हा रस्ताही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. या रस्त्यावरुन परिसरातील अनेक खेड्यांचा संपर्क खानापूरशी होत असतो. मात्र हा रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
लालवाडी-चापगाव रस्ता
लालवाडी ते चापगाव या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून रस्त्याचे अस्तित्वच संपलेले आहे. काही ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण रस्ताच उद्ध्वस्त झाला असल्याने पॅचवर्क करून काहीही उपयोग होणार नसल्याने लालवाडी ते चापगाव रस्ता तातडीने नव्याने होणे गरजेचे आहे. या रस्त्यावरुनही या परिसरातील अनेक गावांचा संपर्क होत असतो. मात्र रस्त्याची चाळण झाल्याने या भागातील ग्रामस्थांना कसरत करून या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता पूर्णपणे नव्याने होणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने या रस्त्यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालून हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चापगाव-हडलगा रस्ता
चापगाव ते हडलगा रस्ताही नामशेष झाला असून या रस्त्यावरुन दुचाकी चालवणे म्हणजे जोखमीचे बनले आहे. चापगाव-हडलगा रस्ताही नव्याने तयार करणे गरजेचे आहे. हा रस्ता वाहतुकीस योग्य झाल्यास बिडी आणि बेकवाड या गावांना संपर्क सुलभ होणार आहे. यासाठी हा रस्ताही होणे गरजेचे आहे.
बेकवाड-बंकी-हडलगा, बिळकी-अवरोळी-बेकवाड रस्ता नादुरुस्त
बेकवाड येथील लक्ष्मीयात्रा 28 फेब्रुवारीला भरविण्यात येणार आहे. या यात्रेसाठीही भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. बेकवाड येथील यात्रा 28 वर्षानंतर होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने जत्रेची जय्यत तयारी सुरू केली आहे. बेकवाड येथील यात्रेत दोन लक्ष्मी बसवण्यात येतात. त्यामुळे या यात्रेचा नावलौकीक वेगळा असून या यात्रेला महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि भक्तगण उपस्थित राहणार आहेत. नंदगड-बिडी रस्त्यावर असलेल्या बेकवाड या गावच्या रस्त्याची समस्या गंभीर बनली आहे. नुकताच नंदगड पोलीस ठाणे ते झुंजवाड क्रॉसपर्यंत रस्ता करण्यात आला आहे. मात्र बेकवाडपासून बिडीपर्यंत रस्त्याची पार दुर्दशा झाली असून या रस्त्यावरुन वाहतूक करताना अनेकवेळेला छोटेमोठे अपघात घडत आहेत. खानापूर-हल्याळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे. मात्र बेकवाड ते बिडी या रस्त्याचे दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. यात्रा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र मुख्य रस्ताच नादुरुस्त असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना या रस्त्यामुळे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच यात्रेपूर्वी रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच बेकवाड गावाला जोडणारा कडतन बागेवाडी-बेकवाड हा रस्ताही नादुरुस्त झालेला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच बेकवाड-बंकी-हडलगा हा रस्ताही होणे गरजेचे आहे. तसेच बिळकी-अवरोळी हा रस्ताही यात्रेपूर्वी दुरुस्त होणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेकवाड परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.